मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सोलापूर आणि सीएसएमटी ते शिर्डी या दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आज शुक्रवारपासून सुरू होणार आहे. या एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

सोलापूर येथील धार्मिक स्थळे, कापड उद्योग आणि शिर्डी येथील साईबाबा मंदिर, पुण्यातील शैक्षणिक केंद्रांपर्यंतचा प्रवास या गाडीमुळे अधिक जलद होणार आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून या दोन्ही गाडय़ांचे आरक्षण करता येणार आहे. मुंबई ते शिर्डीचा प्रवास ५.३० तासांत आणि मुंबई ते सोलापूरचा ६ तास ३० मिनिटांत होणार आहे. वंदे भारत गाडय़ांच्या उद्घाटन सोहळय़ाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून सीएसएमटी स्थानकाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सर्व प्रकारची सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

 गेल्या चार वर्षांत भारतीय रेल्वेचा विस्तार वेगात झाला आहे. या गाडीमुळे राज्यातील अनेक धार्मिक स्थळांना जलदगतीने भेट देता येणार आहे, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी सांगितले. थळ आणि भोर घाटात या दोन्ही गाडय़ांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ही गाडी प्रतितास ११० किमी वेगाने धावू शकते. अपघात टाळण्यासाठी ‘कवच’ संरक्षण यंत्रणेचा या एक्स्प्रेसमध्ये समावेश केला आहे. दोन्ही एक्स्प्रेसमुळे प्रवासाचा कालावधी १ ते २ तासांनी कमी होईल. प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार या एक्स्प्रेसमध्ये सर्व सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक आसनाच्या ठिकाणी चार्जिग सुविधेसह, मोठय़ा आकाराच्या खिडक्या, स्वयंचलित दरवाजे, अत्यावश्यक सूचना केंद्र उपलब्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन हजार फौजफाटा..

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज झाले असून सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात दोन हजारांहून अधिक फौजफाटा तैनात केला आहे. यामध्ये मुंबईसह, रायगड, पुणे आणि ग्रामीण भागातील पोलीस बंदोबस्तात आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर

  • देशातील नववी वंदे भारत
  • आर्थिक राजधानीला सोलापूर कापड आणि हुतात्मा शहरांशी जोडणार
  • सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी यांसारख्या तीर्थक्षेत्रांचा प्रवास जलद
  • एक तास ३० मिनिटांची बचत 
  • जागतिक वारसा तीर्थक्षेत्रांना, कापड व्यापार केंद्राशी जोडणार
  • पुण्यातील पर्यटन स्थळे आणि शैक्षणिक केंद्राला चालना मिळण्याचा विश्वास
  • भोर घाटातील खंडाळा –  लोणावळा घाट विभागात ‘बँकर इंजिन’शिवाय  घाट चढणारी पहिली एक्स्प्रेस.

मुंबई ते साईनगर शिर्डी

  • देशातील दहावी वंदे भारत एक्स्प्रेस 
  • नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डीला मुंबईशी जोडणार
  • राज्यातील दोन आंतरराज्यीय आणि दोन राज्यांतर्गत गाडय़ांसह चार वंदे भारत एक्स्प्रेस