मुंबई : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने विविध ठिकाणी या गीताच्या गायनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. केवळ मुस्लिम आमदारांना लक्ष्य करून राष्ट्रीय गीताच्या नावाने वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तब्बल ५२ वर्षे पक्षाच्या कार्यालयावर तिरंगा न फडकावणारे हेच आता राष्ट्रप्रेमाचा दिखावा करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने मुंबईतील सहा ठिकाणी या राष्ट्रीय गीताच्या गायनाचे कार्यक्रम होणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी याबाबतची घोषणा केली होती. या कार्यक्रमांचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये समाजमाध्यमांवरून वाद सुरू झाला. काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराने ‘वंदे मातरम्’ला विरोध केलेला नाही. तरीदेखील भाजपातर्फे काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि अमिन पटेल यांच्याविरुद्ध चालविला जाणारा अपप्रचार हा अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

तर अस्लम शेख आणि अमिन पटेल यांनी तर स्पष्टपणे भाजपाला आवाहन केले आहे, ‘वंदे मातरम्’ गायचेचे असेल, तर आमच्या कार्यालयाच्या बाहेर नव्हे, थेट आत या आणि गा! असे सावंत यांनी सांगितले. केवळ मुस्लिम आमदारांना लक्ष्य करून राष्ट्रीय गीताच्या नावाने वाद निर्माण करणे हे दुर्दैवी आणि भाजपाच्या विभाजनवादी राजकारणाचे उदाहरण आहे. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रय गीताला १५० वर्षे झाली हा अभिमानास्पद क्षण आहे. परंतु आता त्याचा वापर ध्रुवीकरणासाठी आणि निवडणुकीच्या राजकारणासाठी करणे, भाजपाच्या ढोंगी राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडवते, असाही आरोप सावंत यांनी केला आहे.

‘वंदे मातरम्’ला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे. स्वातंत्र्यलढ्यात संघ नव्हता. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात ‘वंदे मातरम्’ गाण्याचे धैर्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाखवले; त्यावेळी हे तथाकथित राष्ट्रभक्त पळ काढत होते. संविधानाला विरोध करणारे, तब्बल ५२ वर्षे पक्षाच्या कार्यालयावर तिरंगा न फडकावणारे हेच आता राष्ट्रप्रेमाचा दिखावा करत आहेत, असाही टोला सावंत यांनी समाजमाध्यमांवरून लगावला आहे.