मुंबई : वसई – विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी पालिकेत भ्रष्टाचार करून तब्बल १६९ कोटी रुपयांची माया जमविल्याचे मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जाहीर केले. पवार यांनी हा पैसा नातेवाईक आणि पत्नीच्या नावाने उघडलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवला होता. यापैकी ४४ कोटींच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यात आली आहे. याप्रकरणी नुकतेच ईडीने पीएमएलवाय न्यायालयात पवार यांच्यासह १८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

वसई, विरारमधील ४१ अनधिकृत इमारती प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून वसई – विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार, निलंबित नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांना सक्तवसुली संचलनालयाने अटक केली आहे.

सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा पवार यांनी केला होता. ईडीने मंगळवारी प्रसिध्दीपत्रक काढून पवार यांनी भ्रष्ट मार्गाने जमवलेल्या संपत्तीची माहिती दिली.

पवारांनी जमवली १६९ कोटींची संपत्ती

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, अनिलकुमार पवार यांनी आयुक्तपदी असताना बांधकाम परवानग्या देताना मोठी लाच घेत होते. त्यासाठी एक यंत्रणा उभारली होती. त्यात १५० रुपये दर निश्चित करण्यात आला होता. आयुक्त पवार यांना त्यापैकी ५० रुपये प्रति चौरस फूट मिळत होते. हरित पट्ट्यात हा दर ६२ रुपयांपर्यंत होता. यातून पवार यांनी १६९ कोटी रुपयांची संपत्ती जमविल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहे. या संपत्तीमधून ते आलिशान जीवन जगत होते. हिरे, सोन्याचे दागिने, उंची साड्या, शेतघर, गोदामे विकत घेतली होती. विविध गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवले होते.

‘त्या’ ४१ अनधिकृत इमारतींनाही पवार यांचे संरक्षण

नालासोपारामधील ४१ अनधिकृत इमारती प्रकरणात ईडीने तपास करून कारवाई सुरू केली होती. मात्र या ४१ इमारती मी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेण्याच्या आधीपासून असून त्याचा काही संबंध नसल्याचा दावा पवारांनी केला होता. मात्र ४१ अनधिकृत इमारतींना संरक्षण देण्यासाठी पवार यांनी ५० रुपये चौरस फूट प्रति दराने लाच घेतली होती, असे ईडीने म्हटले आहे.

७१ कोटींची मालमत्ता जप्त

पवार यांनी ही सर्व संपत्ती पत्नी, मुलगी आणि अन्य नातेवाईकांच्या नावाने, तर काही बेनामी गुंतवणूक केली होती. यातील ४४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचलनालायने अनिलकुमार पवार, वाय. एस. रेड्डी यांच्यासह १८ आरोपींकडून आतापर्यंत ७१ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

ईडीच्या आरोपपत्रात १८ आरोपी

ईडीने पीएमएलवाय न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात एकूण १८ आरोपींची नावे निश्चित केली आहे. त्यात अनिलकुमार पवार, वाय. एस. रेड्डी, भूमाफिया सिताराम गुप्ता, त्याचा पुतण्या अरूण गुप्ता, वास्तूविषारद मेघा फर्नांडीस, संजय नारंग, आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या पत्नी भारती पवार आदींचा समावेश आहे.