मुंबई : दीड दिवसांच्या गणेशमुर्तींच्या विसर्जनाच्यावेळी जबरदस्तीने नैसर्गिक तलावात विसर्जन केल्याप्रकरणी बोरिवली पश्चिमेकडील वझिरा गावठाण येथील गणेश ग्रामस्थ सेवा मंडळाला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मात्र अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनासाठी परवानगी दिलेली असताना या मंडळालाच नोटीस का बजावली असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
गेल्या आठवड्यात गुरुवारी दीड दिवसांच्या गणेशमुर्तींचे विसर्जन पार पडले. यंदा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या सरसकट सर्वच गणेशमुर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. त्यामुळे ज्या मुर्ती पर्यावरणपूरक किंवा शाडूच्या मातीच्या होत्या त्या मुर्तींचेही विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. समुद्रात किंवा तलावात पारंपरिक पद्धतीने विसर्जन करू न दिल्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजी पसरली होती. दीड दिवसांच्या विसर्जनाच्या दिवशी गणेश भक्त आणि पालिका प्रशासन व पोलिस यांच्यात अनेक ठिकाणी यावरून वादावादी झाली. मात्र पालिका व पोलिसांच्या पथकाने सर्वच गणेशमुर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यास भाग पाडले. परंतु, बोरिवली पश्चिमेकडील वझिरा गावठाण येथील गणेश ग्रामस्थ सेवा मंडळाच्या सार्वजनिक गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यावरून या मंडळाच्या अध्यक्ष व सरचिटणीस यांनी बोरिवली पोलिस ठाण्याने नोटीस बजावली आहे. शनिवारी ही नोटीस बजावण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फूटापर्यंतच्या सर्व मुर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेल आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही तसे आदेश काढले आहेत. मात्र दीड दिवसांच्या विसर्जनाच्यावेळी या आदेशाचे उल्लंघन वझिरा येथील मंडळाने केल्याचे या नोटीशीत म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयाच्या पथकाच्या व पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आल्याचे या नोटीशीत म्हटले आहे. मंडळाने पोलिस आणि पालिकेच्या पथकाला न जुमानता वझिरा तलावात गणेशमुर्तीचे विसर्जन केले होते. मात्र यावेळी काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्नही निर्माण झाला असता, ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल असेही म्हटले आहे.
दरम्यान, श्री गणेश मुर्तीकला समितीचे वसंत राजे यांनी या नोटीशीला विरोध केला आहे. गिरगाव चौपाटीवर एकाही घरगुती गणेशमुर्तीचे विसर्जन समुद्रात करण्यास परवानगी दिली नव्हती. मग केवळ अंबानी कुटुंबियांच्या गणेशमुर्तीचे विसर्जन समुद्रात करण्यास परवानगी कशी काय दिली त्यांना का नोटीस बजावली नाही असा सवाल राजे यांनी केला आहे.