मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले. आज (३० ऑक्टोबर) उपोषणाच्या सहाव्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगेंना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. तसेच त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहनही केलं.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “गरीब आणि रयतेच्या मराठ्यांच्या आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेऊन मोठं आंदोलन उभं केलं आणि प्रस्थापित निजामी मराठा नेतृत्वाच्या विरोधात समाजात जागृती निर्माण केली. २०१४ नंतर मनुस्मृती मानणाऱ्या व्यवस्थेची गढी दुर्दैवाने देशात आणि राज्यात सत्तेत आली आहे. या सत्तेच्या विरोधात कुणी आवाज बुलंद केला, तर त्यांचे मानसिक, सामाजिक, राजकीय खच्चीकरण करून जाती जातीत भांडणं लावून देण्यात येतात. हे थांबवणे गरजेचे आहे.”

“स्वतःचा जीव सांभाळावा असे मी आवाहन करतो”

“आपण प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी या शोषणा विरुद्ध लढा उभा करीत आहात आणि त्यासाठी तुमचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. समाजात लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करणारेच राहिले नाहीत, तर त्यांची बाजू कोण घेणार? गरीब, रयतेच्या मराठ्यांना आपला फार मोठा आधार वाटत आहे. त्यामुळे आपण स्वतःचा जीव सांभाळावा असे मी आपणास आवाहन करतो,” असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं.

“श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांच्या मतावर संपत्ती-सत्ता वाढवली”

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “मराठा आरक्षणाची मागणी करणारे गरीब मराठे आणि ही मागणी पूर्ण करू शकणारे सत्ताधारी निजामी मराठे असे दोन्ही बाजूने मराठे असूनही गरीब मराठ्यांची मागणी पूर्ण होत नाही. सत्ता काँग्रेसची असो, भाजपाची असो किंवा राष्ट्रवादीची असो, यांनी गरीब मराठ्यांच्या प्रश्नाला कधीच महत्त्व दिले नाही. उलट सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांच्या मतावर स्वतःच्या संपत्तीत आणि सत्तेत निरंतर वाढच केलेली आपल्याला दिसते. आपण पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.”

हेही वाचा : मनोज जरांगेंवर तातडीने काय उपचार व्हायला हवेत? आंदोलक आरोग्यसेविका भावनिक होत म्हणाल्या…

“निराशेतून अनेक मराठा तरुणांच्या आत्महत्या”

“तुम्ही आंदोलन व लोक जागृतीद्वारे या विषयावर गांभीर्य निर्माण केले आहे. परंतु दुर्दैवाने सत्ताधारी राज्यकर्ते अतिशय निर्दयी होऊन आपल्या आमरण उपोषणाला दुर्लक्षित करीत आहेत. वर्तमानातील या सत्तेला मानवी चेहरा नाही, असेच म्हणावे लागत आहे. आज अनेक मराठा तरुण निराशेतून आत्महत्या करीत आहेत. त्यांच्याकडेही सध्याचे ३ पक्षाचे सत्ताधारी राज्यकर्ते दुर्लक्ष करताना उभा महाराष्ट्र बघत आहे,” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

“शिर्डीत मोदींकडून मराठा आरक्षणाचा साधा उल्लेखही नाही”

आंबेडकरांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून मोदींनाही लक्ष्य केलं. ते म्हणाले, “मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे येऊन गेले. परंतू त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा साधा उल्लेखही केला नाही. या पूर्वीच्या राज्यकर्त्यांप्रमाणेच वर्तमानातील केंद्र आणि राज्य सरकार यांची भूमिकाही ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच आहे. त्यामुळे आता आंदोलन करत रहाणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण आपली तब्येत सांभाळली पाहिजे. आपण पाणीही घेत नाही ही चांगली गोष्ट नाही. आपण किमान नारळाचे पाणी तरी घ्यावे.”

हेही वाचा : “मी जीव देईन, माझ्या भावावर…”; हंबरडा फोडत महिला आंदोलक म्हणाल्या…

“वंचित बहुजन आघाडी आपल्या आंदोलनाला पाठिंबा”

“वंचित बहुजन आघाडी आपल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केंद्र व राज्यशासनाच्या अखत्यारीतला आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडून गेलेल्या आमदार व खासदारांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन होत नाही, तोपर्यंत केंद्र व राज्यशासन हा प्रश्न गांभीर्याने घेणार नाही आणि ते जागेवरून हलणारही नाही,” अशी महत्त्वाची भूमिका आंबेडकरांनी जाहीर केली.

“खासदार-आमदारांच्या घरासमोर निदर्शने करावी”

“यासाठी आम्ही आपल्याला हे सुचवत आहोत की, मराठा आरक्षणाची तीव्रता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून निवडून गेलेले जे खासदार आणि आमदार आहेत त्यांच्या घरासमोर निदर्शने करावी, तरच ते जागेवरून हलतील. त्यामुळे आपण या उपोषणाला त्या दृष्टीने योग्य वळण द्यावे, अशी विनंती आम्ही आपल्याला करीत आहोत,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “माझं हृदय बंद पडलं तर…”; क्षीण आवाजात मनोज जरांगेंचं वक्तव्य, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यासाठी तुमचं असणं अपरिहार्य आहे”

“या अकार्यक्षम सरकारच्या विरोधात आपला जीव धोक्यात न घालता येत्या निवडणुकीत याच सरकारमधील किंवा सर्वच पक्षांमधील आमदार, खासदार, मंत्री यांना सत्तेतून खाली कसे उतरवता येईल, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आवश्यक आहे. गरीब मराठ्यांची आर्थिक साधने, रोजगार आणि शेतीची दुरावस्था यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी तुमचं असणं अपरिहार्य आहे. पुन्हा एकवेळ आवाहन करतो की, आपण स्वतःचा जीव सांभाळावा,” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं.