मुंबई : मराठीसह विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना ‘नाफा’ जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशनतर्फे अमेरिकेतील सॅन होजेतील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘नाफा ग्लॅमरस फिल्म अवार्ड नाईट’ या सोहळ्यात पालेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘नाफा’च्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे गौरवोद््गार अभिनेते अमोल पालेकर यांनी पुरस्कार स्वीकारताना काढले.

यंदा हॉलिवूडच्या धर्तीवर नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशनतर्फे सॅनहोजे येथे २५, २६ आणि २७ जुलै या कालावधीत दुसऱ्या ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये पार पडलेल्या ‘नाफा ग्लॅमरस फिल्म अवार्ड नाईट’ या सोहळ्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि ‘नाफा’चे संस्थापक अभिजीत घोलप यांच्यासह मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंत व प्रेक्षक उपस्थित होते.

या सोहळ्यातील मनोरंजनपर कार्यक्रमात मराठी लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात आले आणि त्यानंतर कलाकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी उपस्थितांच्या मागणीवरून काही गीतांचे सादरीकरण केले. ‘काही वर्षांपूर्वी गौरी देशपांडे यांच्या कथेवर आधारित चित्रपट करण्याची तयारी मी सुरू केली होती. त्या चित्रपटात निकोल किडमन आणि अमिताभ बच्चन या दोघांना घेऊन मराठी चित्रपट बनविण्याचे माझे स्वप्न होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही निकोलपर्यंत पोहचलो, त्याला पटकथा आवडली आणि त्याने तात्काळ होकारही दिला. मात्र हॉलिवूडमधील कोणत्याही एका स्टुडिओला सोबत घेण्याची अट घातली. या किचकट गोष्टीची कल्पना असल्याने तो विचार मी सोडून दिला. पण त्यावेळी जर ‘नाफा’सारखी संस्था, असे कार्यकर्ते आणि अभिजीतसारखी व्यक्ती असती तर तो प्रकल्प पुढे नेता आला असता. पण आता ‘नाफा’माध्यमातून अशी स्वप्ने पूर्ण होतील’, अशी आशा अमोल पालेकर यांनी व्यक्त केली. तर अभिजीत घोलप म्हणाले की, ‘अमोल पालेकर यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारून ‘नाफा’चाच सन्मान वाढविला आहे. त्यांच्या हळुवार, खुसखुशीत रोमॅन्टिक भूमिकांनी आणि त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने तमाम भारतीय प्रेक्षकांच्या मनात त्यांनी विशेष स्थान निर्माण केले आहे’.