Mumbai BMC Water Supply Cut : मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरलेली असली तरी मंगळवार, ७ ऑक्टोबरपासून पुढील तीन दिवस मुंबईतील काही भागात पाणी टंचाई जाणवणार आहे. शहर आणि पूर्व उपनगरातील काही भागात ७ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत मुंबई महानगरपालिकेने १० टक्के पाणी कपात लागू केली आहे.

मुंबई महानगरपालिकेने पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट विद्युत केंद्रामधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी मीटर जोडणीचे काम ७ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत दररोज दुपारी १२.३० ते ३.०० या वेळेत करण्यात येणार आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतांश विभागांचा पाणीपुरवठा सलग तीन दिवस प्रभावित होण्याची शक्यता आहे. ७ ते ९ ऑक्टोबर असे तीन दिवस १० टक्के पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली.

या विभागात पाणी कपात

शहर विभागातील ए, बी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात संपूर्ण कार्यक्षेत्रात, तसेच पूर्व उपनगरांतील एम – पूर्व आणि एम – पश्चिम विभागातील संपूर्ण परिसरात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. पूर्व उपनगरांतील एल (कुर्ला पूर्व), एन (विक्रोळी, घाटकोपर व घाटकोपर पूर्व), एस (भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व) आणि टी (मुलुंड, पूर्व आणि पश्चिम क्षेत्र) या विभागांमध्ये १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करावा. पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, तानसा, मोडकसागर, मध्यवैतरणा, भातसा, तुळशी, विहार या सातही धरणांत सध्या ९९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांना वर्षभराच्या पाण्याची चिंता नसली तरी पुढील तीन दिवस मुंबईतील काही भागात पाणी कपात लागू असेल.

कुठेकुठे पाणी कपात

शहर विभाग – चर्चगेट, कुलाबा, सीएसएमटी परिसर, डोंगरी, माझगाव, मशीद बंदर, भायखळा, ग्रॅंटरोड, मुंबई सेंट्रल, शिवडी, वडाळा,नायगाव, लालबाग, परळ, दादर प्रभादेवी, वरळी

पूर्व उपनगरात – कुर्ला, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी, देवनार, विक्रोळी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर, भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व क्षेत्र, तसेच मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्र