जलाशयांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा
राज्यातील विविध धरणे, जलाशयांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा असून ऐन उन्हाळ्यात कायमच पाण्यासाठी तहानलेल्या मराठवाडय़ातील ९५७ लघु, मध्यम, व मोठय़ा प्रकल्पांत ३३१५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक असल्याने बऱ्याच वर्षांनंतर राज्याच्या जलसंपदा खात्यावर समाधानाचा शिडकावा दिसत आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने राज्यातील सर्वच विभागांमधील जलाशयांमध्ये पाणीस्थिती बऱ्यापैकी असल्याने, पाणीटंचाईचे भीषण सावट यंदा महाराष्ट्रावर असणार नाही, व नवा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरेसा पाणीसाठा शिल्लक असेल असा विश्वास जलसंपदा खात्याचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.
गेल्या वर्षी याच तारखेस या धरणांमध्ये केवळ १३.४७ टक्के पाणी शिल्लक होते. नाशिक विभागातील ५६१ लहानमोठय़ा धरणांची साठवण क्षमता ६७९५ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. गेल्या वर्षी या धरणांमध्ये १५.८० टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र, २२८६ दशलक्ष घनमीटर म्हणजे २४.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील ५,७०४ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या लघु, मध्यम, व मोठय़ा ३८५ धरणांमध्ये गेल्या वर्षी १०.१६ टक्के पाणीसाठा होता. यंदा या धरणांमधील पाणीसाठा १२.२२ टक्के एवढा आहे. अमरावती विभागातील पाणीसाठय़ात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी या तारखेस काहीशी घट झाली आहे. गेल्या वर्षी या विभागातील ४४३ धरणांमध्ये १८.३४ टक्के पाणी शिल्लक होते. या वर्षी, १७.४३ टक्के म्हणजे १४९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडय़ातील जलाशयांतील पाणीसाठय़ाची टक्केवारी २१.२४ एवढी आहे. गेल्या वर्षी याच तारखेस मराठवाडय़ातील ९५७ जलाशयांमध्ये १६.६० टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
पुणे विभागातील ३५ मोठय़ा धरणांमध्ये सर्वाधिक म्हणजे, १५ हजार ४३५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता आहे. त्यापैकी १२ हजार ४५९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपयुक्त आणि २९७६ दशलक्ष घनमीटर साठा मृत असतो. यंदा २८ मे रोजीच्या स्थितीनुसार या धरणांमध्ये ५५३३ दशलक्ष घनमीटर साठा शिल्लक असून त्यापैकी २६३६ दशलक्ष घनमीटर साठा उपयुक्त आहे. या विभागातील ५० मध्यम प्रकल्पांमध्ये सुमारे ५०० दशलक्ष घनमीटर (२९.४८ टक्के) साठा शिल्लक आहे, तर ६४० लघु प्रकल्पांमध्ये ४३९ दशलक्ष घनमीटर (२६.७२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.
जलस्थिती
गेल्या वर्षी याच तारखेला राज्यातील सर्व जलाशयांमध्ये जेमतेम १६.६७ टक्के म्हणजे पाणीसाठा होता. यंदा हे प्रमाण २२.७३ टक्के एवढे आहे. कोकणात १७५ लघु, मध्यम व मोठी धरणे असून त्यामध्ये ४४.१० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर पुणे विभागातील ७२५ धरणांमध्ये ६,४६४ दशलक्ष घनमीटर (२२.४१ टक्के) साठा शिल्लक आहे.