मुंबई : संपूर्ण ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने ऐन पावसाळय़ात सुमारे दोन हजार गावांना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ आली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये पुणे आणि नाशिक विभागांतील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोकण आणि विदर्भातील एकाही टंचाईग्रस्त गावाची नोंद नाही. मराठवाडय़ात औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही गावे पाणी टंचाईग्रस्त आहेत.जून कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये कमी-अधिक प्रमाणात चांगला पाऊस झाला. ऑगस्ट कोरडा ठणठणीत गेला. त्यामुळे ऐन पावसाळय़ात काही गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

राज्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या साप्ताहिक अहवालात ४ सप्टेंबपर्यंतची टँकर आणि टंचाईग्रस्त गावांची माहिती देण्यात आली आहे. राज्यात सध्या १९५५ गावे आणि वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यात सर्वाधिक पुणे विभागातील १२०६ गावे आणि वाडय़ांचा समावेश आहे. त्या खालोखाल नाशिक विभागातील १६८ गावे आणि ५०१ वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाडय़ात फक्त औरंगाबाद जालना जिल्ह्यातील काही गावे टँकरग्रस्त आहेत. त्यात दोन्ही जिल्ह्यांतील मिळून ५३ गावे आणि २२ वाडय़ांचा समावेश आहे. ७ ऑगस्टपर्यंत राज्यात १५५४ गावे आणि वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. त्यात ऑगस्टमध्ये पावासाने दडी मारल्याने ४०० टँकरग्रस्त गावांची भर पडली.

हेही वाचा >>>गोळीबार करणाऱ्या आरोपीला नवी मुंबईतून अटक

गेल्या वर्षी..यंदा

’गेल्या वर्षी म्हणजे ५ सप्टेंबर २०२२ रोजी राज्यात फक्त १४ गावे, वाडय़ा टँकरग्रस्त.

’या वर्षी याच कालावधीत सुमारे दोन हजार गावांना टँकरने पाणीपुरवठा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’कोकणातील पाचही जिल्हे आणि विदर्भातील ११ जिल्हे सध्या तरी टँकरमुक्त.