पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल, सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यासह इतर डब्यात विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढली आहे. विनातिकीट प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे तिकीट तपासणी वाढवण्याबाबत सतत तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. तिकीटधारक प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम वाढवली असून दररोज साडेतिनशेहून अधिक तिकीट तपासनीसांची फौज पश्चिम रेल्वेवरील स्थानकांत तैनात करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> गुंतवणूकीच्या नावाखाली वयोवृद्ध व्यक्तींची अडीच कोटींची फसवणूक

पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांवर विनातिकीट प्रवाशांचा वावर वाढला आहे. या स्थानकातून विनातिकीट प्रवाशांची गर्दी वाढल्याने तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेने विनातिकिट प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेत स्थानकातील फलाट, पादचारी पूल, स्थानकाचे प्रवेशद्वार याठिकाणी तिकीट तपासनीसांची फौज उभी करण्यात येते. अंधेरी येथे १२ डिसेंबर रोजी अंधेरी येथे ही मोहीम राबवून ९९९ विनातिकीट प्रवाशांना पकडून २,६५,१११ रुपयांची दंडवसुली केली. तर १४ डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात तिकीट तपासणी सुरू होती. लोकलमधून प्रवासी फलाटावर उतरल्यावर त्यांचे त्वरीत तिकीट तपासले गेले. त्याचबरोबर पादचारी पुलावर दोन-दोन फुटांच्या अंतरावर तिकीट तपासणी कर्मचाऱयांनी प्रवाशांची तिकिटे तपासली. सकाळी ८ ते दुपारी ४ आणि दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत २,५९५ विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून ६,८२,३३५ रुपयांची दंडवसुली केली. याप्रमाणे चर्चगेट ते विरार लोकलमधील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.