मुंबई : हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत केंद्र सरकारने वाढवून दिली आहे. आता शेतकऱ्यांना आणखी चार दिवस म्हणजे सहा जुलैपर्यंत विमा योजनेसाठी अर्ज करता येईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या योग्य समन्वयामुळे फळपिक विमा काढण्यासाठी वाढीव मुदत मिळाल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत मृग बहार २०२५ मध्ये द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू, मोसंबी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक ३० जून होती, मात्र २७ जून २०२५ पासून आधार संकेतस्थळाबाबत समस्या असल्याने विमा अर्ज करण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या बाबत केंद्र सरकारशी समन्वय साधल्याने एकूणच परिस्थितीचा विचार करून सहा जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या http://www.pmfby.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन विमा योजनेचा अर्ज करावा, असे आवाहन कोकाटे यांनी केले आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेत खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र, भाडेपट्टीने शेती करणारा नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. या योजने अंतर्गत केंद्र सरकारने त्यांचे विमा हप्ता अनुदान ३० टक्के दरापर्यत मर्यादित केले आहे. त्यामुळे ३० टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्विकारणे क्रमप्राप्त आहे. योजनेंतर्गत ३० ते ३५ पर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्विकारले असून, ३५ टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी ५०:५० टक्के प्रमाणे भरावयाचा आहे. या योजनेत राज्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण वगळता उर्वरित विभागाकरिता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे ची मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम, मिळून प्रती शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेपर्यत राहील.