मुंबई : राज्यभरात मे महिन्यात झालेल्या वळीव, पूर्वमोसमी पावसामुळे सुमारे ३४ हजार ८४२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा सर्वात मोठा फटका अमरावती, जळगाव, नाशिक, जालना, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांना बसला आहे. उन्हाळी कांदा, कडधान्ये, आंबा आणि भाजीपाला पिके मातीमोल झाली आहेत.

राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून वळीव पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्याला बसला असून, १२ हजार २९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावतीतील अचलपूर, भातकुली, चांदूर बाजार, चिखलदरा, धारणी, अमरावती, वरूड, चांदूर रेल्वे, तिवसा, धामणगाव रेल्वे तालुक्यांतील पिकांचे नुकसान झाले आहे.

त्या खालोखाल जळगावमध्ये ४ हजार ५३८, बुलढाण्यात ४ हजार, नाशिकमध्ये ३ हजार २३०, जालन्यात १ हजार ७२६, सोलापुरात १ हजार २५२, चंदूरपूरमध्ये १ हजार ३०८ आणि अकोल्यात ९०९ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत.

नाशिकसह राज्यभरात उन्हाळी कांदा भिजला

मे महिन्याच्या सुरूवातीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक परिसरातील उन्हाळी कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. सतत पाऊस सुरू असल्यामुळे काढणीला आलेला कांदा शेतातून बाहेर काढता आला नाही. कांद्यातील पाण्याचा अंश कमी होण्यासाठी बांधांवर, झाडाखाली ठेवलेला कांदा भिजला आहे. हवेतील आद्रर्तेत अचानक वाढ झाल्यामुळे चाळीतील कांद्याला कोंब येऊन कांदा सडण्याची भिती निर्माण झाली आहे. नाशिकसह धुळे, नंदूरबार, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, जळगाव, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांतही कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.

जुन्नर हापूस, मराठवाड्यातील केशर कवडीमोल

वळीव पावसामुळे जुन्नर परिसरातील जुन्नर हापूस आणि केशर आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणातील हापूस आंबा संपल्यानंतर जूनअखेरपर्यंत जुन्नर आणि मराठवाड्यातील केशर आंब्याची बाजारात आवक सुरू होते. पण, वादळी वाऱ्यासह वळीव पावसामुळे पक्व आंबे तुटून पडले आहेत. झाडांखाली आंब्याचा खच पडला आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात केशर आंब्याचे क्षेत्र मोठे आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केशरचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा मार लागल्यामुळे आंबे सडण्याची भिती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी

राज्यभरात झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी होऊन नदी, नाले, बंधारे ओसंडून वाहिल्यामुळे अनेक ठिकाणी शेतजमिनी खरवडून गेल्या आहेत. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.