Mumbai Traffic Congestion Subway Project मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आता भुयारी मार्गांचा पर्याय राज्य सरकारने स्वीकारला आहे. मुंबई महापालिकेकडून नियुक्त करण्यात येणारा सल्लागार यासंदर्भात सर्वंकष अभ्यास करणार आहे. असे असताना दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मात्र मुंबईत दोन भुयारी मार्ग बांधण्याचे नियोजन सुरू केले आहे. पूर्व उपनगरातून आणि दक्षिण मुंबईतून बुलेट ट्रेन स्थानक आणि मुंबई विमानतळाला अतिजलद पोहचता यावे यासाठी एमएमआरडीएने दोन भुयारी मार्ग (दुहेरी बोगदे) प्रस्तावित केले आहेत. यापैकी एक भुयारी मार्ग चेंबूर – बुलेट ट्रेन, बीकेसी असा असेल, तर दुसरा भुयारी मार्ग वांद्रे रेक्लमेशन – मुंबई विमानतळ व्हाया बुलेट ट्रेन स्थानक, बीकेसी असा असणार आहे.
यासंबंधीचे नियोजन सध्या प्राथमिक स्तरावर असून येत्या काही महिन्यात या दोन्ही भुयारी मार्गांबाबत स्पष्टता येईल.वाढत्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून राज्य सरकारने भुयारी मार्गांचे जाळे मुंबईत विणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यीय समिती नेमली आहे.या समितीच्या निर्णयानुसार पालिकेने मुंबईत भुयारी मार्ग कुठे आणि कसे बांधता येतील याच्या अभ्यासासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी दोन कंपन्या स्पर्धेत असून महिन्याभरात सल्लागाराची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मात्र एमएमआरडीएने मुंबईत भुयारी मार्गांचे जाळे विणण्यास सुरुवातही केली आहे.
ठाणे – बोरिवली भुयारी मार्ग (दुहेरी बोगदा) आणि ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग (दुहेरी बोगदा) या दोन भुयारी मार्गात येत्या काळात आणखी दोन भुयारी मार्गांची भर पडण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएने मुंबईत आणखी दोन भुयारी मार्ग बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एमएमआरडीएतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन भुयारी मार्गांचे नियोजन सध्या प्राथमिक स्तरावर आहे. लवकरच याबाबतचा निर्णय होऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला जाण्याची शक्यता आहे.
येत्या काही वर्षात मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन धावणार आहे. अशा वेळी दक्षिण मुंबई वा पूर्व उपनगरातून मुंबईकरांना अतिजलद बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत पोहचता यावे यासाठी एमएमआरडीएने दोन भुयारी मार्गांचे नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार चेंबूर, अमर महल जंक्शन वा पूर्वमुक्त मार्गाजवळून बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक असा एक भुयारी मार्ग नियोजित आहे. तर दुसरा भुयारी मार्ग वांद्रे रेक्लमेशन – बीकेसी बुलेट ट्रेन असा असणार असून हा भुयारी मार्ग पुढे थेट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडला जाणार आहे. या भुयारी मार्गामुळे नरिमन पाॅईंटवरून सागरी मार्ग आणि सागरी सेतूवरून पुढे थेट बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक, तसेच विमानतळावर अतिजलद पोहचता येणार आहे. या दोन्ही भुयारी मार्गांची लांबी, रुंदी किती असणार, या मार्गांचे नेमके संरेखन कसे असणार, यासाठी किती खर्च अपेक्षित असणार हे एमएमआरडीएकडून या प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतरच स्पष्ट करण्यात येईल.