लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पावसाळ्यात अंधेरी सब वेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिकेने मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या कामाला अजून वेळ लागणार असून यंदाच्या पावसाळ्यातही अंधेरी सब-वेमधून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसमोर आव्हान कायम असेल. यावर्षीही अंधेरी सब वेमध्ये पावसाचे पाणी साचल्यास वाहतूक थांबवणे हाच पर्याय असणार आहे.

मुसळधार पाऊस पडल्यानंतर हमखास पाणी साचण्याच्या ठिकाणांमध्ये ‘अंधेरी सब-वे’, ‘मिलन सब वे’चा समावेश असतो. पावसाळ्यात मिलन सब-वेमध्ये पाणी साचू नये म्हणून साठवण टाकी बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. माक्ष असे असले तरी ‘अंधेरी सब-वे’ मात्र यंदा पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. अंधेरी पश्चिम परिसरातील मोगरा नाल्याची रुंदी बऱ्याच ठिकाणी कमी असल्यामुळे मुसळधार पावसात भरतीची वेळ असताना मोगरा नाल्याच्या पाण्याची पातळी वाढते आणि त्यालगत असलेल्या ‘अंधेरी सब वे’, दाऊद बाग, आझाद नगर, वीरा देसाई मार्ग परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन जीवित, तसेच मालमत्तेची हानी होते.

आणखी वाचा-म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

तसेच हा परिसर बशीसारखा असल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो. अंधेरी पश्चिम भागातील पावसाचे पाणी ‘अंधेरी सब-वे’ मार्गे मोगरा नाल्यामधून वाहून पुढे मिल्लत नगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळ मालाड खाडीत विसर्जित होते. या परिस्थितीचा अभ्यास करून पालिकेने मोगरा नाल्याचे रुंदीकरण करण्याचे ठरवले होते. मात्र, हे रुंदीकरण विविध कारणांमुळे रखडले आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे काम रखडल्यामुळे मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्यावर्षी सुरू होऊ शकलेले नाही. या पुलाची एक बाजू नुकतीच सुरू झाली असल्यामुळे अंधेरी सब वे परिसरातील वाहतुकीचा ताण आता थोडा कमी झाला आहे. त्यामुळे आता या कामासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. या कामाकरीता सल्लागार नेमण्यात आले आहेत, निविदेचा मसुदाही तयार आहे.

आणखी वाचा-धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, रेल्वेची २५.५७ एकर जमीन अखेर ‘डीआरपी’कडे हस्तांतरित

पुन्हा वाहतूक थांबवण्याचाच पर्याय

‘अंधेरी सब वे’ येथून अंधेरी स्थानकाजवळ असल्यामुळे या रस्त्याचा वापर जास्त होतो. त्यामुळे या पावसाळ्यात अतिवृष्टीच्या वेळी अधिकचे मनुष्यबळ तैनात करणे, पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवणे आणि नाल्याची पाणीपातळी वाढली की वेळीच वाहतूक थांबवणे हे उपाय करावे लागणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अंधेरी सब वे परिसर हा सखलभाग असून जवळच मोठा उतार असल्यामुळे ताशी ५० मिमी पाऊस पडल्यावर प्रति सेकंद ५० हजार लिटर पाणी जोराने वाहत येते. त्या तुलनेत नाल्याची रुंदी कमी असल्यामुळे पाणी साचते. त्यामुळे नाल्याचे रुंदीकरण करणे आवश्यक असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.