मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील विजेत्यांना अखेर मोठा दिलासा देण्यात आला आहे. जानेवारी २०२० ते जून २०२१ दरम्यान देकारपत्र देण्यात आलेल्या पात्र विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी मंडळाकडून ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. करोना आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता पात्र विजेत्यांना १६ जानेवारी २०२२ पर्यंत घराची रक्कम भरता येणार आहे.

सोडतीतील पात्र विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी काही टप्पे निश्चित करत एक ठरावीक मुदत देण्यात येते. या मुदतीत त्यांनी घराची रक्कम भरणे अपेक्षित असते.  मात्र या मुदतीतही रक्कम न भरल्यास पात्र विजेत्यांच्या घराचे वितरण रद्द करण्याची तरतूद आहे. त्यामुळे घराची रक्कम निर्धारित वेळेत भरणे अत्यंत गरजेचे आहे. असे असताना मागील दीड ते दोन वर्षांत करोना आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक विजेते निर्धारित वेळेत घराची रक्कम भरू शकलेले नाहीत. त्यात मुंबई मंडळाची घरे मुंबई महानगरपालिकेने अलगीकरणासाठी ताब्यात घेतल्याने ताबा देण्यास विलंब होत आहे. यातील काही घरे मंडळाला परत मिळाली आहेत, तर काही घरे परत मिळणे बाकी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व बाबी लक्षात घेत मंडळाने जानेवारी २०२० ते जून २०२१ दरम्यान तात्पुरते देकार पत्र वितरित करण्यात आलेल्या पात्र विजेत्यांना याआधी घराची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.