मुंबई : नोव्हेंबरचा महिना आला की देशात कुठे हिवाळ्याची चाहूल लागते तर कुठे अजूनही पावसाच्या हलक्या सरी पडतात. या बदलत्या हवामानात धुक, प्रदूषण आणि थंड हवेमुळे श्वसनाचे त्रास वाढण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी फुफ्फुसांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं ठरत. म्हणूनच नोव्हेंबर महिन्याला क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी) जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो.जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार सीओपीडी हा जगातील मृत्यूंचा चौथा प्रमुख कारण आहे.

सीओपीडी हा फुफ्फुसांचा दीर्घकालीन व हळूहळू वाढणारा आजार आहे. यात फुफ्फुसांमधील हवेचा प्रवाह कमी होतो, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. सतत खोकला, श्वासाचा आवाज (व्हिजिंग), छातीत दडपण जाणवणे आणि थोड्याशा कष्टानेही दम लागणे ही त्याची प्रमुख लक्षण आहेत. या आजाराचा सर्वात मोठा कारणीभूत घटक म्हणजे धूम्रपान. त्याशिवाय घरगुती धूर, औद्योगिक धूळ, वायुप्रदूषण, रासायनिक वायू आणि आनुवंशिक घटक हेही जोखीम वाढवणारे घटक मानले जातात.भारतामध्ये देखील सीओपीडी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, देशात दरवर्षी सुमारे ५५ लाखांहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत, आणि ग्रामीण भागात घरगुती धूर व जीवाश्म इंधनाचा वापर हे मोठे कारण ठरते. केवळ २०२१ मध्येच या आजारामुळे सुमारे ३.५ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ जगातील एकूण मृत्यूंपैकी जवळपास ५ टक्के मृत्यू या रोगामुळे झाले.

सीओपीडी पूर्णपणे बरा होणारा नसला तरी लवकर निदान, धूम्रपानाचा त्याग, प्रदूषणापासून संरक्षण, आणि नियमित व्यायाम यामुळे लक्षणांवर नियंत्रण ठेवता येते. फुफ्फुसांची कार्यक्षमता टिकवण्यासाठी नियमित तपासणी आणि श्वसन तज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.ग्रामीण भागात पारंपरिक चुलींचा धूर आणि अपूर्ण वायुविजन असलेली घरे ही मोठी कारणं आहेत. शहरी भागात मात्र वाहनांचे धूर, औद्योगिक प्रदूषण आणि तंबाखूचे सेवन ही मुख्य कारणं दिसून येतात.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतात प्रत्येक दहा मृत्यूंपैकी किमान एक मृत्यू श्वसनविकाराशी संबंधित असतो. विशेषतः वृद्ध नागरिक आणि दीर्घकाळ धूम्रपान करणारे यांच्यात या आजाराचे प्रमाण अधिक आहे.हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात बहुतेक वेळा ओळखला जात नाही. साधा खोकला, थोडा श्वास घेण्याचा त्रास याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. पण हेच लक्षण पुढे तीव्र रूप घेतं. तज्ज्ञ सांगतात की फुफ्फुसांची कार्यक्षमता एकदा कमी झाली की ती पुन्हा पूर्ववत होत नाही, त्यामुळे लवकर निदान हेच प्रभावी उपचाराचं मुख्य साधन आहे.

या आजारात सर्वप्रथम धूम्रपानाचा त्याग हे नियंत्रित ठेवण्याच सर्वात प्रभावी पाऊल आहे. त्याचप्रमाणे प्रदूषणापासून बचाव करणे म्हणजे बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. घरगुती धूर टाळून एलपीजी, बायोगॅससारख्या स्वच्छ इंधनांचा वापर करावा. नियमित तपासणी हा महत्त्वाचा भाग असून फुफ्फुसांचे कार्य तपासणाऱ्या स्पायरोमेट्री टेस्टद्वारे आजाराचे लवकर निदान करता येते. त्याचप्रमाणे श्वसनाचे व्यायाम व योगासने फुफ्फुसांची ताकद टिकवण्यासाठी उपयुक्त ठरतात. सीओपीडी पूर्णपणे बरा करता येत नसला तरी योग्य वेळी निदान, उपचार आणि जीवनशैलीतील सुधारणा यांद्वारे रुग्ण चांगल्या दर्जाचे आयुष्य जगू शकतो. नोव्हेंबर हा महिना या वास्तवाची जाणीव करून देतो की फुफ्फुसांचे आरोग्य टिकवणे म्हणजे जीवनाचा श्वास जपणे होय.

सीओपीडीसारख्या दीर्घकालीन आजारांबाबत सार्वजनिक आरोग्य प्रणालीमध्ये अधिक जागरूकता आणि प्राथमिक तपासणी केंद्रांची उपलब्धता वाढवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात अजूनही या आजाराविषयी माहितीचा अभाव असल्यामुळे रुग्ण उशिरा रुग्णालयात दाखल होतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात सीओपीडी व इतर श्वसनविकारांसाठी स्वतंत्र जागरूकता मोहीम राबवण्याची गरज असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.