मुंबई : सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी केलेल्या कारवाईत चेन्नईतील एका महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. आरोपी महिलेकडे दोन दुर्मिळ गिबन्स माकडे सापडली असून त्यांची सुटका करण्यात आली. या प्राण्यांना मूळ देशात परत पाठवण्यात आले. विमानतळावर गिबन्स माकडांची तस्करी केली जात असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार सापळा रचून संबंधित महिलेला विमानतळावर अटक करण्यात आली. महिलेच्या सामानाची तपासणी करताना सामान्यातील एका टोपलीत लपवून ठेवलेली एक नर व एक मादी गिबन्स माकड सापडले. गिब्बन माकड गुदमरलेल्या अवस्थेत होते. त्यांना तात्काळ रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वाइल्ड लाइफ वेल्फेअर (रॉ) संस्थेकडे तात्पुरत्या उपचारासाठी सुपूर्द करण्यात आले.
दरम्यान, त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार करून वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ मधील तरतुदींनुसार त्यांना तस्करी करून जेथून आणले, तेथे परत पाठवण्यात आल्याचे रॉचे संचालक पवन शर्मा यांनी सांगितले. ठाणे वनविभागाने यापूर्वी मे महिन्यात गिबन्स माकडांच्या तस्करीप्रकरणी कुलाबा येथे केलेल्या कारवाईत आठ माकडे मृतावस्थेत, तर एक जिवंत माकड जप्त केले. याप्रकरणी मलेशियन नागरिक असलेल्या एका महिलेला वन विभागाने ताब्यात घेतले होते. या कारवाईत वन कर्मचाऱ्यांना ४ सियामंग गिबन्स प्रजातीची, ३ गोल्डन गिबन्स आणि २ पिगटेल माकडे आढळली. त्यातील ८ माकडे मृतावस्थेत होती, तर १ पिगटेल माकड जिवंत होते.
लुप्तप्राय प्रजाती
गिबन्स ही लुप्तप्राय प्रजातींच्या यादीत आहे. त्याचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्याच्या परिशिष्ट १ आणि वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अनुसूचीमध्ये संरक्षित प्रजातीमध्ये आहे. दुर्मीळ आणि धोक्यात असलेली ही प्रजाती प्रामुख्याने अग्नेय आशियातील काही भागात आढळते आणि आंतरराष्ट्रीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्यांना संरक्षण देण्यात आले आहे.
सर्वात मोठे गिब्बन
गिबन प्रजातींच्या माकडांपैकी सियामंग हे सर्वांत मोठे असते. सिम्फॅलॅंगस वंशातील ही एकमेव प्रजाती आहे. सियामंगच्या दोन उपप्रजाती आहेत. त्यात सुमात्रन सियामंग आणि मलेशियन सियामंग या प्रजातींचा समावेश आहे. तस्करीमुळे सियामंग ही प्रजाती धोक्यात आली आहे. याचबरोबर इंडोनेशिया आणि मलेशिय या दोन्ही देशांमध्ये त्यांचा अधिवासही नष्ट होत आहे. सियामंगचे केस लांब, दाट असतात. सियामंगची सरासरी लांबी ९० सेमी असते. सियामंग प्रामुख्याने आहार म्हणून जंगलातील विविध वनस्पती खातात. त्यांच्या आहारात ६० टक्के फळांचा समावेश असतो. त्यांचा मुख्य अन्नस्रोत अंजीर आहे. सियामंग प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडच्या जंगलात आढळतात.