मुंबई : दहिसर येथील एस. व्ही रोडजवळील न्यू जनकल्याण सोसायटीत रविवारी दुपारी तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत १९ जण जखमी झाले असून त्यातील एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला. तसेच, अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक असून सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शांती नगरातील २३ मजली न्यू जनकल्याण सोसायटीच्या सातव्या मजल्यावर रविवारी दुपारी अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच रहिवाशांनी आरडाओरडा करून इमारतीबाहेर पळ काढला. मात्र, अनेक रहिवासी इमारतीतच अडकले. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने दुपारी १ वाजून ९ मिनिटांनी आगीला क्रमांक १, तर ३ वाजून २८ मिनिटांनी आगीला क्रमांक २ ची वर्दी दिली. अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र, आगीची तीव्रता सातत्याने वाढत होती. इमारतीच्या तळघरातील दोन मीटर बॉक्स आगीच्या संपर्कात आले. तळमजल्यापासून ते चौथ्या मजल्यापर्यंत विद्युत यंत्रणा जळून खाक झाली.
दरम्यान, या इमारतीतील ३६ रहिवासी आगीच्या विळख्यात सापडले होते. अग्निशामकांनी संबंधित रहिवाशांची सुटका केली. मात्र, त्यातील १९ जण जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रोहित, नोर्थरन केअर, प्रगती व कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील रोहित रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तसेच, शताब्दी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाचीही प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरित रुग्णांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात यश आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत अग्निशमन दलाकडून तपास केला जात आहे.