मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेची ४५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना वर्सोवा पोलिसांनी अटक केली. या आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
अंधेरीत राहणाऱ्या ५१ वर्षीय महिलेने याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आरोपी मेघना सातपुते आणि राकेश गावडे हे फिर्यादीला भेटले होते. त्यांनी स्वत:ला सिंधुदुर्गच्या एसएसएमपी वैद्यकीय महाविद्यालयाचे विश्वस्त, तसेच भाजप नेत्याचा नातेवाईक असल्याचा दावा केला होता. या महाविद्यालयात फिर्यादीच्या मुलीला प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. टप्प्पाटप्प्याने वेगवेगळी कारणे देत त्यांनी तिच्याकडून ४५ लाख रुपये उकळले.
या प्रकारात अन्य दोन आरोपी सहभागी होते. परंतु फिर्यादीच्या मुलीला महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. दरम्यान, फिर्यादीने सिंधुदुर्गमधील एसएसएमपी वैद्यकीय महाविद्यालयात संपर्क साधला असता आरोपींनी तिची फसवणूक केल्याचे लक्षात आले. आरोपी महाविद्यालयाचे विश्वस्त नव्हते तसेच भाजप नेत्याशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे उघडकीस आले. हा प्रकार उघडकीस येताच तिने संबंधित आरोपीविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीनंतर मेघना सातपुते, नितेश पवार, राकेश गावडे आणि अन्य एका आरोपीविरोधात पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी तपास करून तीन आरोपींना अटक केली. चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींनी अन्य कुणाची फसवणूक केली आहे का, त्याचा तपास करण्यात येत आहे, असे वर्सोवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडगे यांनी सांगितले.