मुंबई : एका ३२ वर्षीय महिलेवर भोंदू बाबाने उपचाराच्या नावाखाली बलात्कार केला आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी भोंदू बाबाला अटक केली. सांताक्रुझ परिसरात राहणारी पीडित महिला गेल्या काही काळापासून कौटुंबिक समस्या आणि शारीरिक व्याधींमुळे त्रस्त होती. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी तिने अब्दुल रशीद (४५) नावाच्या एका भोंदू बाबाकडे मदत मागितली. या भोंदू बाबाने महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. तिच्यावर भूतबाधा झाल्याचे त्याने सांगितले. तांत्रिक विधी करून भूतबाधा दूर करता येते असे त्याने तिला पटवून दिले.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कथित उपचारासाठी त्याने पीडित महिलेला भेटायला बोलावले. तिथे तांत्रिक विधीचे नाटक करून त्याने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना घडल्यानंतर काही काळ पीडितेला हा एक उपचार असल्याचा गैरसमज होता, मात्र नंतर तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने मंगळवारी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
आरोपी अब्दुल रशीद विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६४ (२) अन्वये बलात्कार आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायद्याच्या (अंधश्रद्धा विरोधी कायदा) कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बुधवारी अब्दुल रशीदला अटक केली.
या घटनेमुळे समाजात अशा भोंदू बाबांविरोधात कठोर कारवाईची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये आणि कोणत्याही उपचारासाठी वैज्ञानिक आणि योग्य मार्गाचा अवलंब करावा. या प्रकरणाचा पुढील तपास सांताक्रुझ पोलीस करीत आहेत, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
भोंदू बाबांकडून अत्याचाराच्या अलीकडील घटना
ऑगस्ट २०२५ : विरारमध्ये अंगात ४ भूत आहेत असे सांगून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २२ वर्षीय अंध भोदू बाबाने ३ वेळा बलात्कार केला. याप्रकरणी विरार पोलिसांनी भोंदू बाबासह दोघांना अटक केली.
जानेवारी २०२५ : विरारमध्ये एका ४५ वर्षीय महिलेला पोटदुखी आणि मानसिक त्रासावर उपाय म्हणून एका भोंदू बाबाकडे नेण्यात आले. त्याने उपचाराच्या नावाखाली महिलेला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी या बाबाला अटक केली असून त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्च २०२४ : ठाण्यात एका १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला, एका भोंदू बाबा काळ्या जादूच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवित असल्याचा पोलीस तपासात उघड झाले. हा बाबा गरीब महिला आणि मुलींना श्रीमंत होण्याचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करीत होता. तसेच त्यांची चित्रफीत बनवून त्यांना ब्लॅकमेल करीत होता.