मुंबई : गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ५.३ किलोमीटर लांबी आणि तिहेरी मार्गिका असलेल्या जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे उत्खनन कार्य जलद गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत भूमिगत जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रांची आवश्यकता असून त्यापैकी एका टीबीएमचे सर्व घटक भाग कार्यस्थळी दाखल झाले आहेत. ऑगस्ट २०२६ मध्ये बोगद्याच्या खोदकामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. या टप्प्यानंतर रस्ते प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळणार आहे.
महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग प्रकल्प चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा ३ (ब) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे ५.३ किलोमीटर लांबीच्या, तिहेरी मार्गिका असलेल्या बोगद्यासाठी लॉन्चिंग शाफ्ट उत्खनन जलद गतीने सुरू आहे. या कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी पाहणी केली. भूमिगत जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रे आवश्यक आहेत. यापैकी एका बोगदा खनन संयंत्राचे सर्व घटक भाग जोश मैदान या ठिकाणी दाखल झाले आहेत. हे सुटे भाग जपानहून एकूण ७७ कंटेनरमधून आयात करण्यात आले आहेत. दुसऱ्या बोगदा खनन संयत्राचे घटक भाग डिसेंबर २०२५ पर्यंत कार्यस्थळी दाखल होण्याची अपेक्षा आहे. या घटक भागांची बांगर यांनी पाहणी केली. या बोगदा खनन संयंत्राच्या घटक भागांची जोडणी ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. तर, दुसऱ्या बोगदा खनन संयंत्राच्या घटक भागांची जोडणी ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर बोगदा खोदकामास प्रत्यक्षात सुरुवात होईल.
तिहेरी मार्गिका असलेल्या पेटी बोगद्याचे काम अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक स्वरुपाचे आहे. बोगदा खनन संयंत्रांच्या सहाय्याने एकूण सुमारे ५.३ किलोमीटर लांबीपर्यंत दुहेरी बोगद्यांचे खोदकाम करण्यात येणार आहे. पेटी बोगद्यासह हे एकूण अंतर सुमारे ६.६२ किलोमीटरपर्यंत वाढेल. प्रत्येक बोगद्याचा बाह्य व्यास सुमारे १४.४२ मीटर इतका असेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे बोगदे मुंबईतील आतापर्यंतचे सर्वात मोठे ठरतील, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. बांगर यांनी ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे उत्खनन कार्य सुरू असलेल्या ठिकाणास भेट दिली. या शाफ्टचे एकूण आकारमान अंदाजे २०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि ३० मीटर खोल आहे. आतापर्यंत सुमारे १०० मीटर लांबी आणि ५० मीटर रुंदीच्या क्षेत्रात खोदकाम सुरू करण्यात आले असून, १० मीटर खोलीपर्यंतचे कार्य पूर्ण झाले आहे. खोदकाम खोलवर सुरू असून बाजूच्या भिंती खचू नयेत म्हणून ‘रॉक अँकरिंग’ केले जात आहे. सद्यस्थितीत आठवड्यातील सातही दिवस अहोरात्र म्हणजेच २४ तास काम सुरू आहे. याच गतीने युद्धपातळीवर कार्यवाही करून डिसेंबर २०२८ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता आहे. उत्तर मुंबईतील वाहतुकीस याचा मोठा फायदा होणार आहे. विशेषत: दादासाहेब फाळके चित्रनगरी – मुलुंडदरम्यान नवीन जोडमार्ग तयार होणार आहे. पश्चिमेकडील मुंबई किनारी रस्ता – मालाड माईंडस्पेस आणि थेट ऐरोलीला हा मार्ग जोडला जाणार आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय सिग्नल मुक्त आणि वाहतूक कोंडीशिवाय थेट मालाड – ऐरोलीदरम्यान प्रवास करणे सुलभ होणार आहे. पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरे यामधील प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे, असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला.
