मुंबई : हृदयरोगानंतर जगभरातील मृत्यूंचे दुसरे सर्वात मोठे कारण ठरलेला ‘मेंदूविकाराचा झटका’ म्हणजेच स्ट्रोक आज सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन यांच्या अहवालानुसार दरवर्षी जगभरात तब्बल १.२ कोटींहून अधिक लोकांना स्ट्रोकचा झटका येतो तर सुमारे ५० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यातील तब्बल ८९ टक्के प्रकरणे विकसनशील देशांमध्ये विशेषतः भारत आणि दक्षिण आशियात घडतात.

भारतात दरवर्षी स्ट्रोक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॅशनल स्ट्रोक रजीस्ट्री प्रोग्राम २०२४ नुसार देशात दरवर्षी १५ ते १८ लाख नवे रुग्ण समोर येतात. ‘द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ’ २०२३ च्या अहवालानुसार या आजारामुळे भारतात मृत्यूचे प्रमाण मागील दशकात जवळपास दुप्पट झाले आहे. विशेष म्हणजे, आता या आजाराचे वय ६० वर्षांवरून खाली सरकले असून ३० टक्क्यांहून अधिक रुग्ण ४० वर्षांखालील तरुण आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांत सर्वाधिक प्रमाण दिसते. ग्रामीण भागात वेळेवर उपचार न मिळाल्याने ६ ते ८ तासांचा विलंब होतो जो जीवितासाठी निर्णायक ठरतो.

तज्ञांच्या मते स्ट्रोकची लक्षणे लवकर ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेला ‘बीफास्ट’ हा मंत्र लक्षात ठेवणे गरजेचे आहे. बॅलन्स (तोल बिघडणे), डोळे (दृष्टी धूसर होणे), चेहरा (चेहऱ्यावर एका बाजूचा ताण कमी होणे), हात (हातात कमजोरी), बोलणे (बोलण्यात अडथळा), वेळ (त्वरित रुग्णालयात पोहोचणे). मुंबईतील ज्येष्ठ न्युरोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार स्ट्रोक हा ‘गोल्डन ऑवर’चा आजार आहे. लक्षणे दिसल्यापासून पहिल्या ६० मिनिटांत उपचार मिळाल्यास मेंदूचे नुकसान मर्यादित ठेवता येते. पण दुर्दैवाने, भारतातील बहुतेक रुग्ण रुग्णालयात पोहोचेपर्यंत ती ‘सुवर्णवेळ’ संपलेली असते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार स्ट्रोकच्या ८० टक्के घटना जीवनशैलीतील बदलांनी टाळता येऊ शकतात. उच्च रक्तदाब, धूम्रपान, मद्यपान, तणाव, जास्त मीठाचे सेवन आणि व्यायामाचा अभाव हे या आजाराचे प्रमुख कारण ठरतात. भारतात सध्या ३५ टक्क्यांहून अधिक लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत तर केवळ २५ टक्केच प्रौढ व्यक्ती नियमित शारीरिक व्यायाम करतात. या सगळ्याचा परिणाम म्हणून मेंदूतील रक्तवाहिन्यांवर दाब वाढतो आणि अचानक झटका येण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.

भारत सरकारने या स्थितीकडे लक्ष देत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत स्ट्रोकसाठी विशेष उपचार केंद्रे उभारण्यास सुरुवात केली आहे. देशातील १८० हून अधिक जिल्ह्यांमध्ये स्ट्रोक युनिट्स सुरू झाल्या असल्या तरी ग्रामीण भागात त्यांचे प्रमाण अद्याप अपुरे आहे. ग्रामीण रुग्णालयांत मेंदूविकारासाठी प्रशिक्षित न्युरोलॉजिस्ट नसल्याने तात्काळ निदान आणि उपचारात अडथळे येतात.

या वर्षीच्या जागतिक स्ट्रोक दिनाची थीम ‘टू गेदर वी सेव्ह द लाईफ’ सर्व नागरिकांना एकत्र येऊन जागरूकता वाढवण्याचे आवाहन करते. कारण प्रत्येक मिनिटात मेंदूतील १.९ दशलक्ष पेशी नष्ट होतात, त्यामुळेच वैद्यकीय तज्ज्ञ ‘टाईम इज ब्रेन’ असे ठामपणे सांगतात. आज स्ट्रोक हा केवळ वैद्यकीय विषय राहिला नाही, तर सामाजिक जबाबदारीचा मुद्दा झाला आहे. वेळेवर निदान, रुग्णवाहिका उपलब्धता आणि निरोगी जीवनशैली हेच यावरच खर औषध आहे.