लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळीतील दोन पुनर्वसित इमारतींचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून या घरांचा ताबा देण्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केले होते. मात्र काही कारणाने कामास विलंब झाल्याने बीडीडीवासीयांची घराची प्रतीक्षा लांबली आहे. आता या ५५० घरांच्या ताब्यासाठी मार्च २०२५ चा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव येथील तीन बीडीडी चाळींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून केला जात आहे. वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासांतर्गत १५,५९३ रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात येणाऱ्या ३३ पैकी १२ पुनर्वसित इमारतींची कामे सध्या सुरू आहेत. त्यापैकी दोन इमारतींची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून त्यात ५५० घरांचा समावेश आहे. उर्वरित कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करून इमारतींना निवासी दाखला घेत घरांचा ताबा देऊ असे मंडळाकडून सांगितले जात होते. पण आता मात्र दोन्ही इमारतींची कामे पूर्ण होण्यास विलंब झाल्याने ५५० घरांचा ताबा मार्च २०२५ मध्ये देण्यात येणार असल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आणखी वाचा-मुंबई पोलीस दलात सप्टेंबरमध्ये सात हजारांहून अधिक कर्मचारी सेवेत

पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण होणाऱ्या घरांचा ताबा मार्च २०२५ मध्ये देण्याचे नियोजन असून वरळीच्या बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक ३०, ३१ आणि ३६ मधील पात्र ५५० रहिवाशांना या घरांचा ताबा दिला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टप्प्याटप्प्याने घरांचा ताबा

२०२५ मध्ये टप्प्याटप्प्याने जशी कामे पूर्ण होतील. तसतसा घरांचा ताबा देण्याचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार मार्च २०२५ मध्ये ५५० घरांचा ताबा दिल्यानंतर पुढील तीन महिन्यांत आणखी काही घरांचा ताबा दिला जाणार आहे. तर पुढे प्रत्येक तीन महिन्यांनी बीडीडीवासीयांना घराचे वितरण केले जाणार असल्याचेही मंडळाकडून सांगण्यात येत आहे.