मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरळी बीडीडी चाळीतील दोन पुनर्वसित इमारतींमधील घरांचा काही रहिवाशांनी तातडीने ताबा घेतला असून नव्या घरात रहिवाशांची गणेश आगमनाची लगबग सुरू झाली आहे. नव्या घरात बुधवारी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एका रहिवाशांने तर नवीन घरात बीडीडी चाळीचा सुंदर देखावा साकारला केला आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. वरळीतील दोन पुनर्वसित इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्याने १४ ऑगस्ट रोजी ५५६ घरांचा ताबा सोहळा पार पडला. तर १८ ऑगस्टपासून मुंबई मंडळाने रहिवाशांना प्रत्यक्ष घराची चावी देण्यास सुरुवात केली. यंदा नवीन घरात गणेशोत्सव साजरा करण्याची इच्छा अनेक रहिवाशांची होती.
शक्य तितक्या रहिवाशांनी तातडीने घरांचा ताबा घेतला आणि यंदाचा गणेशोत्सव नव्या घरात साजरा करण्याची तयारी सुरू केली. काही रहिवासी ताबा मिळालेल्या नव्या घरात प्रथमच गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करीत आहेत. तर वर्षानुवर्षे बीडीडी चाळीतील घरात, त्यानंतर काही वर्षे संक्रमण शिबिरातील घरात आणि आता नव्या ५०० चौरस फुटांच्या घरात काही रहिवासी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत. यापैकीच एक रहिवासी मंगेश अंकुश राजगुरू यांच्या घरी मागील २० वर्षांपासून गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे.
यंदा मात्र राजगुरू कुटुंब ४० मजली इमारतीतील २ बीएचकेच्या घरात गणेशोत्सव साजरा करणार आहे. नव्या घरात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने हे कुटुंब आनंदी आहे, मात्र त्याचवेळी जुन्या घरातील आठवणी आजही त्यांच्या मनात घर करून आहेत. बीडीडी चाळी एक-एक करत जमिनदोस्त होत आहेत. त्यामुळे या कुटुंबाने आपल्या बीडीडी चाळीतील घराच्या आठवणी जागविण्यासाठी घरात बीडीडी चाळीचा सुंदर असा देखावा साकारला आहे.
रोशन जाधव यांच्या घरीही मागील २५ वर्षांपासून गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. अगदी आजोबांपासून बीडीडीतील जुन्या घरात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानंतर तीन वर्षे संक्रमण शिबिरातील घरात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यंदा मात्र जाधव कुटुंब नव्या ५०० चौरस फुटांच्या घरात गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणार आहे. नव्या घरात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही तातडीने घराचा ताबा घेतला. गणेशोत्सवानंतर घराची अंतर्गत सजावट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जुन्या घरात उत्साहात गणेशोत्सव साजरा होत होता. पण जागा छोटी असल्याने मोठा देखावा करता येत नव्हता. दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांची काहीशी अडचण होत होती. पण आता मात्र मोठ्या घरात आम्ही मोठा देखावा साकारला आहे. आता पाहुण्यांची सरबराई करणेही शक्य होईल, असेही रोशन जाधव यांनी सांगितले.
आधी नव्या घरात गणेशोत्सव आणि अंतर्गत सजावट नंतर करणार, असे सचिन डिका यांनी सांगितले. मागील दोन दिवसांपासून त्यांच्या नवीन घरात सजावटीची तयारी सुरू असून बुधवारी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. नव्या घरात गणेशोत्सव साजरा होत असल्याने आई-वडिलांना आनंद झाला आहे, असेही डिका म्हणाले. गणेशोत्सवानंतर घरातील अंतर्गत सजावटीचे काम हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डिका, जाधव आणि राजगुरू यांच्यासह अन्य काही रहिवाशांच्या नव्या घरात गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे.
आतापर्यंत १३३ रहिवाशांनी घेतली घराची चावी
मुंबई मंडळाने १८ ऑगस्टपासून नव्या घराची चावी देण्यास सुरुवात केली आहे. नव्या घरात गणेशोत्सव साजरा करण्याची अनेकांची इच्छा होती, त्यामुळे शनिवार-रविवारही घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार आतापर्यंत १५१ रहिवाशांना ताबा पावती वितरीत करण्यात आली आहे. यापैकी १३३ रहिवाशांना चावी देण्यात आल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.