वातानुकूलित लोकलच्या आणखी आठ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. येत्या २० जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहीती पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली.

सध्या पश्चिम रेल्वेकडे चार वातानुकूलित लोकल आहेत. दररोज त्यांच्या ३२ फेऱ्या होतात. त्यात आता आणखी आठ फेऱ्यांची भर पडणार असून एकूण फेऱ्या ४० पर्यंत पोहोचेल. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत या फेऱ्या होतील. शनिवारी आणि रविवारी मात्र ३२ फेऱ्याच होतील. तर या दिवशी वातानुकूलित लोकल फेऱ्याऐवजी आठ सामान्य लोकलच्या फेऱ्या होतील, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५ मेपासून ५० टक्के कपात करण्यात आली होती. यानंतर पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या काही फेऱ्यांनाही प्रतिसाद वाढू लागला. पूर्वी वातानुकूलित लोकलसाठी दिवसाला दीड ते तीन हजार तिकीटांची विक्री होत होती. आता आठ ते नऊ हजार तिकीटांची, तर ५०० ते एक हजार पासची विक्री होत आहे. वाढत्या प्रतिसादामुळे पश्चिम रेल्वेने १६ मेपासून वातानुकूलित लोकलच्या आणखी १२ फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या. त्यामुळे दररोज होणाऱ्या २० फेऱ्यांची संख्या ३२ पर्यंत पोहोचली होती. प्रवाशांचा प्रतिसाद वाढतच असल्याने पश्चिम रेल्वेने आणखी आठ फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

जलद लोकल

अप दिशेने

विरार ते दादर जलद – स. ६.५७ वा.
विरार ते चर्चगेट जलद- स. ९.३४ वा.
मालाड ते चर्चगेट-सायं. ६.४४ वा.
वसई रोड ते चर्चगेट-रात्री ८.४१ वा.

जलद लोकल

डाउन दिशेने

दादर ते विरार – स. ८.१८ वा.
चर्चगेट ते मालाड – स. ११.०३ वा.
चर्चगेट ते वसई रोड – सायं. ७.०५ वा.
चर्चगेट ते विरार-रात्री ९.५७ वा.