इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक आणि ‘बॉम्ब प्लॅनर’ यासीन भटकळ याची अटक सुरक्षा आणि तपास यंत्रणेचे सर्वात मोठे यश मानले जात असले तरी भटकळच्या अटकेनंतर इंडियन मुजाहिदीन संपणार नाही अशी भीती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पाकिस्तानी तालमीत तयार झालेल्या यासीन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांत आपली पाळेमुळे देशात आणि देशाबाहेर घट्टपणे रोवली असून त्यांच्या कारवाया थांबविण्यासाठी यंत्रणेपुढे मोठे आव्हान असेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
यासीन भटकळच्या अटकेबद्दल दहशतवादविरोधी पथकाने समाधान व्यक्त केले आहे. यासीन हा सगळ्यात खतरनाक दहशतवादी होता आणि त्यामुळे संघटनेचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. संघटनेला हा मोठा धक्का असल्याचे राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांनी सांगितले. पण त्याच्या अटकेने संघटनेची कार्यपद्धती, इतर योजना आणि साथीदार याबाबत महत्वाची माहिती मिळू शकेल असे ते म्हणाले.