मुंबई :मालाड पश्चिम येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) बांधकाम स्थळावरील इमारतीच्या १० व्या मजल्यावरून पडून अभियंता ओंकार संख्ये (२४) याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मालाड पोलिसांनी श्री जी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक निमेश देसाई, त्यांचे भागीदार आणि साईट सुपरवायझर यांच्याविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बांधकामस्थळी सुरक्षेची साधने उपलब्ध नसल्याचा आरोप मयत ओंकारच्या वडिलांनी केला होता.

७ जुलैला नेमकं काय घडलं?

बोरिवली पश्चिमेला राहणारा स्थापत्य अभियंता ओंकार संख्ये (२४) श्रीजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या विकासकाच्या कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करीत होता. या विकासकाचा मालाड पश्चिमेच्या वालनाई येथे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. ओंकार या प्रकल्पाचे काम पहात होता. नेहमीप्रमाणे तो ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता कामावर गेला होता. सायंकाळी ५.४५ च्या सुमारास तो तपासणीसाठी बांधकाम स्थळावरील इमारतीच्या १० व्या मजल्यावर गेला होता.

तपासणी करताना त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपकरणे देण्यात आली नव्हती. ओंकार १० व्या मजल्यावरील लोखंडी फळीवरून चालत असताना खाली सहाव्या मजल्यावर पडला. त्याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. त्याच्या सहकाऱ्यांनी ओंकारला तातडीने मालाड पश्चिम येथील झेनिथ रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे काही वेळातच उपचारादरम्यान ओंकारचा मृत्यू झाला. ओंकारच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत (फ्रॅक्चर) झाली होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.

बांधकामस्थळी सुरक्षेच्या साधनांचा अभाव

ओंकारचे वडील विनोद संख्ये (६४) यांनी ओंकारच्या मृत्यूला विकासक आणि ठेकेदाराला जबाबदार धरले आहे. त्यांनी विकासक निमेश देसाई, त्यांचे भागीदार आणि बांधकाम स्थळाच्या पर्यवेक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विकासक आणि पर्यवेक्षकाने त्यांच्या मुलाला कोणतेही सुरक्षा उपकरण, हेल्मेट, सुरक्षा पट्टी (सेफ्टी बेल्ट) प्रदान केले नव्हते. बांधकामस्थळी सुरक्षा जाळी देखील लावलेली नव्हती. त्या इमारतीमधील लोखंडी फळी नीट बसवली नव्हती. ती स्लॅबच्या एका बाजूला आधाराशिवाय कंलडली होती. त्यामुळे त्या फळीवरून चालताना ओंकार खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला, असा आरोप विनोद संख्ये यांनी तक्रारीत केला आहे.

विकासक, ठेकेदाराविरोधात गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी सुरुवातीला मालाड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. मात्र ओंकारच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मालाड पोलिसांनी विकासक निमेश देसाई, इतर भागीदार आणि ठेकेदाराविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे) आणि २९० (इमारत पाडणे, दुरुस्त करणे किंवा बांधकाम करताना निष्काळजीपणाचे कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.