लोअर परळ वर्कशॉप परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वांद्रे पथकाने यश आले आहे. हरिशकुमार गुप्ता (२२) अटक तरूणाचे नाव असून त्याला मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात १८ जुलै रोजी अत्याचार, छेडछाड केल्याप्रकरणी ‘महिलांवरील गंभीर गुन्हे, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२’ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिसांच्या सूचनेनुसार लोहमार्ग, मुंबईच्या गुन्हे शाखेचे वांद्रे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. या पथकाने मिळालेली माहिती आणि सीसी टीव्ही चित्रणाच्या माध्यमातून गुप्ताला चर्चगेट येथून अटक केली. गुप्ता मूळचा मध्य प्रदेशमधील रहिवासी आहे. चौकशीदरम्यान गुप्ताने गुन्ह्याची कबुली दिल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पुढील तपास करण्यासाठी आरोपीला मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या सूचनांनुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दिन शेख यांच्या पथकाने गुप्ताला अटक केली.