लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : दिवाळीची धामधूम सुरू असताना ॲन्टॉप हिल येथे एका तरुणाची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली. फटाके फोडण्यावरून झालेल्या वादानंतर तरूणाची हत्या करण्यात आली. याबाबत पोलीस तपास करीत आहेत. ॲन्टॉप हिल पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली आहे.

कार्तिक आर. मोहन देवेंद्र हा कोकरी आगार परिसरातून दुचाकीवरून जात असताना मोनू नावाचा तरुण तेथे पाय पसरून बसला होता. त्याचे मित्र तेथे फटाके वाजवत होते. त्यावेळी उभयतांमध्ये वाद झाला. तेथे उपस्थित असलेल्या विवेक गुप्ताने मध्यस्ती करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु काही वेळानंतर पुन्हा याच कारणावरून वाद झाला. तेव्हाही विवेकने मध्यस्थी केली. विवेकने केलेली मध्यस्थीमुळे कार्तिकला राग आला. त्यानेअन्य आरोपींना सोबत घेऊन रात्री १२.४५ च्या सुमारास विवेकला एकट्याला गाठले. त्यानंतर एकाने लाथा बुक्क्याने, दुसऱ्याने बॅटने, तर राजपुटी नावाच्या आरोपीने त्याच्याकडील चाकूने विवेकवर वार केले. यात विवेक गंभीर जमखी झाला. याबाबत माहिती मिळताच ॲन्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी विवेकला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

आणखी वाचा-म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२४ : सुमारे ४४२ घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उपायुक्त रागसुधा आर., सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची सहा पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. याबाबत माहिती मिळताच आरोपींनी मुंबई बाहेर पळण्याचा प्रयत्न केला. परंतु सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने व त्यांच्या पथकाने रावळी कॅम्प रुग्णालय, कोकरी आगार परिसर, तसेच नातेवाईकांकडे लपून बसलेल्या सहा आरोपींना पकडले. आरोपींमध्ये कार्तिक आर. मोहन देवेंद्र त्याची पत्नी, कार्तिक कुमार देवेंद्र, विकी मुत्तू देवेंद्र, मिनीअण्ण, रवी देवेंद्र आणि राजपुटी यांचा समावेश आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्यातील पूर्ववैमनस्याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.