मुंबईः पोलीस भरतीसाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीनंतर अस्वस्थ वाटू लागलेल्या तरूणाचा हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमर अशोक सोलके(२४) असे मृत तरूणाचे नाव असून तो अमरावती येथील नवसारीतील रहिवासी आहे. तो पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी मुंबईत आला होता. तो सध्या फोर्ट परिसरातली रेसिडन्सी हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. सोलकेने मंगळवारी मैदानी चाचणी दिल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटत असल्याचे त्याने परिचीत व्यक्तीला सांगितले होते. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास सोलके हॉटेलमध्ये आंघोळ करत असताना त्याला उलटी झाली व तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी सोलकेशी परिचीत तरूणीचा जबाब नोंदवून एमआरए मार्ग पोलीसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा >>> मुंबई : मेहूण्याला मारहाण केल्याचा जाब विचारायला गेलेल्याची हत्या, शिवडी येथील चौघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी पोलीस भरतीसाठी आलेल्या गणेश उगले या २६ वर्षीय तरुणाचा शुक्रवारी मृत्यू झाला होता. १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली आणि तो खाली कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकूल पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद  करण्यात केली आहे. मूळचा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेला उगले हा अन्य तरुणांसह मुंबई पोलीस दलातील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता.