मुंबई : मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढण्यात आले असून त्याची अश्लील चित्रफित तयार करून ३० हजारांची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार तरुण २३ वर्षांचा असून वांद्रे येथे राहतो. तो मर्चंट नेव्हीमध्ये चांगल्या पदावर कामाला आहे. त्याला रविवारी दुपारी व्हॉट्स ॲपवर एका तरूणीने फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर तक्रारदार तरुणाची त्या अनोळखी मुलीशी मैत्री झाली आणि दोघे बोलू लागले. अनोळखी तरुणीने आपल्या मधाळ बोलण्याने त्याला जाळ्यात ओढण्यास सुरूवात केली. तिने व्हॉट्स ॲप आणि टेलिग्रामच्या डिपीवर सुंदर मुलीचे छायाचित्र ठेवले होते. त्यामुळे आपण बोलत असलेली तरूणी हीच असल्याची त्याला खात्री पटली.
दुसऱ्या दिवशी त्या अनोळखी तरूणीने त्याला व्हिडियो कॉल करून अश्लील संभाषण (सेक्स चॅट) कऱण्यास सांगितले. समोरील तरुणीने व्हिडियो कॉलवर सेक्स चॅट करताना आपले कपडे काढले आणि त्याला देखील अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. यानंतर त्या दोघांच्या व्हिडियो कॉलचे रेकॉर्डिंग केेले. काही वेळाने त्याला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्या तरुणीसोबत केलेले अश्लील व्हिडियो रेकॉर्डींग वायरल करण्याची धमकी देण्यात आली. तसे न करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी त्या व्यक्तीने केली.
मात्र या तरुणाने पैसे देण्यास नकार दिला. दोन दिवस त्याला धमकाविण्याचे प्रकार सुरू होते. अखेर सोमवारी समोरील व्यक्तीने या तरुणाचे अश्लील संभाषणाचे व्हिडियो इन्स्टाग्राम या समाज माध्यमवार वायरल केला. त्यामुळे तरुणाने पोलिसांची मदत घ्यायचे ठरवले. तरुणाने वांद्रे पोलिसात तक्रार दाखल करून झालेल्या फसवणुकीची माहिती दिली. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६७, ६७ (अ), तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.
सेक्सटॉर्शन म्हणजे काय ?
सेक्स्टॉर्शन म्हणजे लैंगिक खंडणीचा प्रकार. हा एक ब्लॅकमेलचाच नवा प्रकार आहे. सेक्स्टॉर्शनची सुरुवात साधारणपणे सामान्यतः अनोळखी तरुणींकडून समाजमाध्यमात फ्रेंड रिक्वेस्टने होते. अनेक वेळा तरुण मंडळी आपला बराच वेळ समाजमाध्यमांवर घालवतात. याचदरम्यान उत्सुकतेने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते. त्यातून चॅटिंग सुरु होते. काही मेसेज आणि नंतर संभाषण, अधिक खासगी होत जाते. नंतर व्हॉटसॲप सुरु होते. यातून नंबर शेअर केला जातो. यातूनच नंतरच्या गोष्टी वेगाने घडतात.
अश्लील संभाषण करत सुरुवत केली जाते आणि व्हिडियो कॉल करण्यास उद्युकत केले जाते. अनेकदा बाथरुममध्ये जाण्यास सांगण्यात येते. त्यानंतर एन्जॉय केलेल्या व्हिडिओ चॅटची रेकॉर्ड केलेली क्लिप, कोणी तरी पाठवलेली असते. पैसे द्या अन्यथा क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. मात्र पैसे देऊन अशा सेक्सटॉर्शनचा शेवट होतोच असे नाही. बदनामीची भीती घालून आर्थिक लूट सुरू होते. सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढत असून अनोळखी व्यक्तीशी संभाषण करताना सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.