गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्रीय मंत्रिमंडळ, सर्व मुख्यमंत्री, शेकडो खासदारांनी स्वत:ला निवडणुकीच्या प्रचारात झोकून दिलं आहे. मग देश कोण चालवतंय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गुजरात मॉडेल दाखवून देश जिंकला. ते विकासाचे नव्हे तर फक्त जाहिरातीचे पॉलिटिकल मॉडेल असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळाची फौज व विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी गुजरातेत धाडले आहे. काँग्रेसने भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. ‘वन नेशन वन इलेक्शन’ पॉलिसी हा भाजपने अजेंडा ठरवला आहे. या अंतर्गत केंद्र व इतर सर्व राज्यांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तोच धागा पकडून आदित्य यांनी गुजरात निवडणुकांचा उल्लेख करत संसदेचा मान राखला नसल्याचे ट्विटमध्ये सांगितले. सर्वचजण प्रचारात गुंतल्यामुळे देश कोण चालवतंय असा प्रश्न पडल्याचे त्यांनी म्हटले.

गुजरातच्या विकासाच्या मॉडेलवरही त्यांनी टीका केली. ज्या गुजरातच्या विकासाचे मॉडेल दाखवून देश जिंकला. ते विकासाचे मॉडेल नाहीच असे सांगत ते फक्त जाहिरातीवर चालणारे पॉलिटिकल मॉडेल असल्याची टीका त्यांनी केली. केंद्र सरकार व भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंच्या ट्विटवरून दिसून आले. दरम्यान, शिवसेनाही गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आहे.