करोनाकाळात नियमावली ठरवून देवस्थाने सुरू करण्याची मागणी

नागपूर : करोनाच्या काळात गोरगरिबांसाठी सामाजिक उपक्रम राबवून मदतीचा हात देणाऱ्या देवस्थानांचे कर्मचारीच सध्या संकटात सापडले आहेत. टाळेबंदीत शिथिलता दिल्यावरही धार्मिक स्थळांवर निर्बंध कायम असल्यामुळे विदर्भातील बाराशेच्यावर मोठय़ा देवस्थानातील सुमारे २५ हजार कर्मचारी अडचणीत आले आहेत.

शहरात टेकडी गणेश मंदिर, बेसातील गुरुमंदिर, साई मंदिर, बालाजी देवस्थान, कोराडीतील देवी मंदिर, पारडीतील भवानी देवी मंदिरासह छोटी मोठी १२४० धार्मिक स्थळे आहेत, तर विदर्भात अमरावती अंबादेवी संस्थान, कौंडण्यपूरला विठ्ठल-रुख्मिणी देवस्थान, गुरू मंदिर कारंजा, अयप्पा मंदिर, महाकाली मंदिर, आदासा, धापेवाडा, कोराडी ही मोठी मंदिरे आहेत.

या सर्व मंदिरात पुजाऱ्यासह २० ते २५ हजार कर्मचारी असून त्यांची उपजीविका देवस्थानातील वेतनावर चालते. मात्र करोनामुळे देवस्थान अद्याप सुरू झाली नसल्यामुळे भाविकांची संख्या रोडावली आहे. पर्यायाने दानदात्यांची संख्या कमी झाल्याने देवस्थानांचे उत्पन्न घटले आहे.

वर्धा मार्गावरील साई मंदिरात ३४ कर्मचारी असून त्यांचे वेतन थांबवले नाही. पण मंदिराचे आर्थिक उत्पन्न कमी झाल्यामुळे अशीच जर स्थिती राहिल्यास येत्या काळात परिस्थिती कठीण होईल. टेकडी गणेश मंदिरात मोठय़ा प्रमाणात उत्पन्न होते. या ठिकाणी १४ स्थायी कर्मचारी आणि सुरक्षारक्षाकासह १५ कर्मचारी कंत्राटी काम करतात. त्यांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. विदर्भात अमरावती अंबादेवी संस्थान, कौंडण्यपूरला विठ्ठल-रुख्मिणी देवस्थान, गुरू मंदिर कारंजा, अयप्पा मंदिर, महाकाली मंदिर, आदासा, धापेवाडा, कोराडी या देवस्थानात कर्मचाऱ्यांची हीच स्थिती आहे.

कोराडी देवी मंदिरात ४०च्यावर कर्मचारी आहेत. त्यांच्या मानधनामध्ये कपात केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

करोनाच्या काळात अनेक देवस्थानांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून गोरगरिबांना भोजनदान केले. मात्र आता त्यांच्याच कर्मचाऱ्यांना मानधनाअभावी उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे. दरम्यान, करोना काळात टाळेबंदी शिथिल केल्याने विदर्भातील देवस्थानेही नियमावली ठरवून सुरू करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे सनत गुप्ता यांनी केली आहे.

 

पूजा साहित्य विक्रेत्यांना फटका

देवस्थान बंद असल्यामुळे हार, फुले, प्रसाद आणि अन्य साहित्य विक्रेत्यांवर परिणाम झाला आहे. विशेषत: विदर्भातील माहूर, शेगाव, नागपुरातील साई मंदिर, टेकडीच्या गणेश मंदिर परिसरातील  दुकानदारांना फटका बसला आहे.

करोनामुळे देवस्थान बंद असल्यामुळे मंदिराच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून देवस्थानने साई मंदिरातील कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली नाही किंवा वेतन थांबवले नाही. उलट तीन महिन्यांत सामाजिक उपक्रम राबवले. अन्य देवस्थानांतील व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांची कपात न करता त्यांना मानधन द्यावे

– राजू देशमुख , पदाधिकारी, साई मंदिर, वर्धा रोड