वैमानिक बनून विमान उडवणे ही एक कला आहे आणि अभ्यास व सरावानेच ही साध्य होते. मात्र, त्याहीपेक्षा विमानाच्या प्रतिकृती तयार करणे आणि रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने दिलेले अडथळे पार करत ती विमाने उडवणे हे जास्त कठीण आहे. या विषयाचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येकालाच ही कला साध्य होईल, असे नाही. मात्र, आयआयटी कानपूर येथे ३ ते ६ मार्चदरम्यान आयोजित राष्ट्रीय पातळीवरील ‘ट्रेक क्रीट’ मध्ये गौरव जोशी आणि त्याच्या चमूने नागपूरचा झेंडा रोवला.

एअरोनॉटिकलच्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर संधी मिळावी म्हणून दरवर्षी एअरोस्पेस कंपन्यांच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर ‘ट्रेक कीट’ महोत्सव आयोजित केला जातो. यात अनेक तांत्रिक स्पर्धा होतात. ३ ते ६ मार्चदरम्यान झालेल्या या महोत्सवात बोईंग एअरोस्पेस कंपनीच्यावतीने विमान तयार करणे आणि ते उडवण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात विमान तयार करायचे होते आणि ती दिलेले अडथळे पार करत उडवायचीही होते. यातही दिलेल्या वेळेत अधिकाधिक वेगाने विमान उडवून ते सर्व अडथळे पार करणे, हे मोठे आव्हान होते.

गौरव जोशीने हे आव्हान लिलया पेलत राष्ट्रीय पातळीवरील या स्पध्रेत पहिले स्थान प्राप्त केले. ‘रुल्स द स्काय’ या दुसऱ्या स्पध्रेत विमाने तयार करण्यासोबतच दिलेले ‘स्टंट’ करायचे असतात. ते पार करून दिलेल्या ठिकाणीच विमान योग्य पद्धतीने उतरवायचे असते. या स्पध्रेत स्पर्धकाच्या गुणवत्ता आणि गतीवर गुण अवलंबून असतात. यातही गौरवने दुसरे स्थान प्राप्त केले. या महोत्सवाअंतर्गत झालेल्या ‘मल्टी रोटर’ या तिसऱ्या स्पध्रेत हेलिकॉप्टरसारखे एक यंत्र असते आणि त्याला एकापेक्षा अनेक पंख असतात. हे यंत्र तयार करण्यापासून तर दिलेले अडथळे पार करत उडवावे लागते. वेगवेगळ्या आकाराच्या चौकटी तयार केल्या जातात आणि दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त चौकटीतून हे यंत्र उडवावे लागते.

गौरव जोशी अव्वल

नागपुरातील प्रियदर्शिनी महाविद्यालयाचा एअरोनॉटिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षांच्या गौरव जोशीने ओंकार पांडे, सुमीत चौरे, मोहित रंगलानी, नीरज खट्टर या सहकाऱ्यांच्या सहाय्याने महोत्सवात सहभाग घेतला. ‘एअरोव्हिजन’ या नावाने ही चमू या महोत्सवात उतरली आणि त्यांना एअरोनॉटिकल विभागाचे प्रमुख प्रा. प्रवीण खोपे यांनी मार्गदर्शन केले. यापूर्वी तीनदा तो या स्पध्रेत सहभागी झाला आणि प्रत्येक वेळी त्याने प्रथम स्थान प्राप्त केले. सातव्या वर्गापासून तो या क्षेत्राशी जुळला असून वडील राजेश जोशी यांचे मार्गदर्शन आणि भाऊ वैभव जोशी यांचे सहकार्य त्याला मिळाले.

स्पर्धा कुठे व कशा?

या महोत्सवाअंतर्गत उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, अशा चार विभागात स्पर्धा होते. या प्रत्येक विभागातून तीन चमू निवडल्या जातात आणि एकूण बारा चमुंची स्पर्धा आयआयटी दिल्ली येथे आयोजित केली जाते. प्रामुख्याने एअरोस्पेस कंपन्यांच्यावतीने एअरोनॉटिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी या महोत्सवाच्या माध्यमातून स्पर्धा घेतल्या जातात. यात बोईंगपासून तर एअरबस कंपन्यांचा सहभाग असतो.