आरोग्य राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांची मेडिकलला भेट

नागपूर : सार्वजनिक आरोग्य खात्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी सोमवारी मेडिकलला भेट दिली. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत मेडिकलला गर्भजल तपासणी प्रयोगशाळा उभारण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे,  सर्वाधिक सिकलसेलचे रुग्ण  विदर्भात आढळत असतानाही येथे आवश्यक गर्भजल तपासणीची सोय नाही. त्यामुळे येथील नमुने तपासणीसाठी हैदराबाद, मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवावे लागत होते.

डॉ. यड्रावकर यांनी नागपुरातील आरोग्य विभागातील विविध विषयांचा आढावा घेतला. या बैठकीला मेडिकलचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंग, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्यासह मेडिकलच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सिकलसेलवर नियंत्रणासाठी  सिकलसेल असलेल्या जोडप्याचे लग्न टाळणे,  सिकलसेल बाधितांना होणाऱ्या बाळाची सिकलसेल तपासणी आवश्यक आहे.  यासाठी गर्भजल तपासणी आवश्यक आहे. परंतु ही तपासणी  येथे होत नव्हती. ही बाब निदर्शनात आल्यावर मेडिकलमध्ये या स्वतंत्र प्रयोगशाळेचे नियोजन करण्यात आले. ही प्रयोगशाळा झाल्यावर  येथील नमुने मुंबई, हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठवले जाणार नाहीत. दरम्यान, भंडारा? जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर मंत्र्यांनी मेडिकलमधील अग्निशमन अंकेक्षणासह ऑक्सिजन पुरवठय़ाची माहिती घेतली. येथील कोविड लसीकरणाबाबतही त्यांनी जाणून घेतले. ही  माहिती  डॉ. जायस्वाल यांनी  डॉ. यड्रावकर यांना दिली.