गडकरींच्या आक्षेपांवर आयुक्तांचा खुलासा; महापौरांकडून नवीन प्रश्नांची मालिका

नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पावरून सुरू झालेली महापौर-आयुक्तांमधील आरोप-प्रत्यारोपांची मालिका दिवसागणिक नवीन वळण घेत आहे. या संघर्षांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही उडी घेतल्याने या विषयाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. दरम्यान, आज बुधवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी  गडकरींचे आक्षेप  प्रसिद्धी पत्रकाद्वारे खोडून काढले तर महापौरांनी आयुक्तांचा हा खुलासा दिशाभूल करणारा असल्याची टीका केली.

स्मार्ट सिटीतील नियुक्ती वैधच – मुंढे 

स्मार्ट सिटी प्रकल्पाशी संबंधित कंपनीवरील मुख्य कार्यकारी पदावरील नियुक्ती वैध असून या माध्यमातून केलेल्या कामात कोणतीही अनियमितता झाली नाही, असा दावा महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंढे यांच्यावर आरोप करणारे पत्र केंद्रीय नगरविकास मंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्र्यांकडे पाठवले होते व कारवाईची मागणी केली होती. बुधवारी मुंढे यांनी या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देणारे पत्रक प्रसिद्धीला दिले असून सर्व आरोप फेटाळले आहेत. स्मार्ट सिटीच्या  एनएसएससीडीएलच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार पाहण्याचे आदेश  कंपनीचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांनीच भ्रमणध्वनीवर दिले होते. या काळात ट्रान्सफर सेक्शनच्या निविदा रद्द करून  बायो मायनिंगच्या निविदा काढण्याचा निर्णय कंपनी अध्यक्षांच्या परवानगीनेच घेतला. कंपनीतील कर्मचाऱ्यांची सेवामुक्ती ही त्यांच्या कामाचा वार्षिक आढावा घेतल्यानंतरच करण्यात आली. या काळात कार्यालयीन खर्च व वेतनाच्या देयकाशिवाय केवळ एकच देयक मंजूर करण्यात आले. ते यापूर्वीच मंजूर केलेल्या कामाचे व करार झालेल्या कंत्राटदाराचे व त्यांनी केलेल्या कामाचे  आहे. कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत असताना कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही. संचालक मंडळाची बैठक करोनाच्या साथीमुळे होऊ शकली नाही, मात्र पुढच्या काळात ती प्रस्तावित असून त्यात वरील सर्व बाबी ठेवल्या जातील, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

आयुक्त दिशाभूल करताहेत – महापौर

आयुक्तांनी त्यांच्यावरील आरोपाचा केलेला खुलासा दिशाभूल करणारा आहे, असा पलटवार महापौर संदीप जोशी यांनी केला आहे. जोशी यांनी आयुक्तांच्या खुलाशातील सर्व मुद्दे खोडून काढले आहेत. मुंढे यांनी त्यांची एनएसएससीडीएलवरील नियुक्ती कंपनीचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांनी भ्रमणध्वनीवरील आदेशाद्वारे झाल्याचे स्पष्ट केले. मात्र यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची नियुक्ती परदेशी यांनी पत्राद्वारे नियुक्ती केल्याचे सांगितले होते. या पत्राची प्रत ते मागणी करूनही का देत नाहीत. नियमानुसार भ्रमणध्वनीवर दिलेले निर्देश वैध असतात का, असा सवाल जोशी यांनी केला. संचालक मंडळाने मंजूर केलेल्या निविदा रद्द करण्याचा तसेच कर्मचारी बडतर्फ करणे बेकायदेशीरच आहे. अधिकार नसताना स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बँक ऑफ महाराष्ट्रतील खात्यावर स्वाक्षरी का केली, देयके मंजूर कशी केली, कंत्राटदाराला वीस कोटीचे देयक कसे दिले, आदी प्रश्न जोशी यांनी उपस्थित करून त्यावर आयुक्तांनी खुलासा करावा अशी मागणी केली. संचालक मंडळाची बैठक घेण्यासाठी  अध्यक्षांकडे पत्रव्यवहार का केला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या सर्व बाबींवरून आयुक्त दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप जोशी यांनी केला.