नागपूर : नियम मोडणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना शिस्त लावण्यासाठी परिवहन खात्याने ५ फेब्रुवारी सायंकाळी ६ ते ६ फेब्रुवारीच्या सकाळी ६ वाजेपर्यंत राज्यभरात विशेष मोहीम राबवली. त्यात एकाचवेळी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ ते कनिष्ठ अधिकाऱ्यांनी ३ हजार ६२ बसेसवर कारवाई केली. या कारवाईत २१३ बसेस जप्त करण्यात आल्या. सर्वाधिक कारवाई ठाणे, पुणे परिसरांत झाली.

परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी राज्यातील प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांपासून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांना या मोहिमेत सहभागी करून घेतले. प्रती अधिकारी किमान ३ बसेसवर कारवाईचे लक्ष्य होते. ठाणे परिसरातील ५३९ बसेस, पुणे- ४७२, कोल्हापूर ३०१, पनवेल २५८, अमरावती २१६, धुळे २०९, लातूर १६३, मुंबई सेंट्रल ५६, मुंबई (पूर्व) ५९, मुंबई (पश्चिम) १०८, नांदेड ७०, नाशिक १३८, औरंगाबाद १४२, नागपूर शहर १३८, नागपूर ग्रामीण १६४, प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात २९ बसेसवर कारवाई झाली. यापैकी  नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या २१३ बसेस जप्त करण्यात आल्या. यामध्ये ४३ पुणे परिसरातील, ३२ ठाणे, लातूर आणि अमरावतीतील प्रत्येकी २५, कोल्हापूर १७, औरंगाबाद १५, नाशिक १२, नांदेड १०, पनवेल ८, धूळे ७, नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीणच्या प्रत्येकी ५ आणि प्रत्येकी ३ बसेस मुंबई सेंट्रल, मुंबई (पूर्व), मुंबई (पश्चिम) या तीन कार्यालय हद्दीतील होत्या.

पुणे परिसरात सर्वाधिक अधिकारी या मोहिमेत सर्वाधिक १०० अधिकारी पुणे परिसरात तर मुंबई सेंट्रल १०, मुंबई (पूर्व) १८, मुंबई (पश्चिम) २९, ठाणे ६३, पनवेल ३८, कोल्हापूर ७२, लातूर २८, नांदेड २३, अमरावती ५७, नाशिक ३७, धुळे ४७, औरंगाबाद ३१, नागपूर शहर २७, नागपूर ग्रामीण ३९, परिवहन आयुक्त कार्यालय परिसरात ४ अधिकारी नियुक्त करण्यात आले होते.

कारवाई का?

  •  विना परवाना वा परवाना अटीचा भंग
  • टप्पा वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र
  • प्रवासी बसमधून अवैध मालवाहतूक
  •  वाहनामध्ये केलेले बेकायदेशीर केलेले फेरबदल
  •  रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादी नसणे
  •  क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक
  •  मोटार वाहन कर न भरणे
  •  प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे