६ हजार पोलिसांचा बंदोबस्त ल्ल मार्ग निश्चित, वाहतुकीत बदल
‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात गणरायाला निरोप देण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली असून, त्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. विसर्जन तलावाजवळील सर्व हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून, सुरक्षेसाठी सहा हजारावर पोलीस तैनात करण्यात येणार आहे.
१७ सप्टेबरला ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना झाली. २६ आणि २७ सप्टेबरला अनंतचतुर्दशीला विसर्जनाचा मुहूर्त आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. तलावाच्या काठावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहे. वाहनतळाचीही व्यवस्था असणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलिसांनी केलेल्या नियोजनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त भारत तांगडे यांनी केले आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यात नक्षल विरोधी पथक तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय सीआयएसएफ जवानांचीही मदत घेतली जाणार आहे. बॉम्ब शोधक, नाशक पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकातील जवान साध्या पोशाखात मिरवणुकीत सहभागी होऊन लक्ष ठेवणार आहे.
महापालिकेची तयारी
प्रत्येक प्रभागात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम टँकची व्यवस्था महापालिकेने केली अ्सून काही सामाजिक संस्थाही यात सहकार्य करणार आहे. निर्माल्य गोळा करण्यासाठी प्रत्येक तलावाच्या ठिकाणी निर्माल्यकुंभ ठेवण्यात आले आहेत. सामाजिक संस्थेचे प्रतिनिधीही यावेळी निर्माल्य गोळा करणार आहेत.

गणेश विसर्जनाचे मार्ग
फुटाळा तलाव – लकडगंज, कोतवाली, तहसील, अजनी, गणेशपेठ हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळे व इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून येणारी मंडळे गांधीसागर मार्गाने फुटाळा तलावाकडे जातील.
गांधीसागर तलाव – इतवारी भागातून जाणारे गणपती अग्रेसेन चौक, चिटणीस पार्क मार्गाने टिळक पुतळा व गांधीसागर तलावाकडे जातील. बडकस चौकातून येणारे घरगुती गणपती गांधीगेटच्या मार्गाने तलावाकडे जातील.
नाईक तलाव – पाचपावली भागातून गणपती विसर्जनाकरिता येणाऱ्या भाविकांनी कमाल चौक , पाचपावली पोलीस ठाणे ते बारसेनगर येथून  पंचकमेटी मार्गाने तलावाकडे जावे. विसर्जनासाठी आणलेली गणेश मूर्ती उचलून नंतर तलावाकडे न्यावी.
सोनेगाव तलाव – सोनेगाव तलावावर येणारे गणपती सावरकरनगर चौक येथून खामला मार्गाने, सहकार नगर मार्गाने तसेच वर्धा मार्गाने सोनेगाव तलावाकडे न्यावे. तेथे काही अंतरावर वाहने ठेवून मूर्ती तलावात विसर्जित करावी.
सक्करदरा तलावातही विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. तेथे खासगी टॅन्क ठेवण्यात आले असून, मूर्ती विसर्जनासाठी स्वयंसेवकही तैनात असतील.
एकूण गणेशोत्सव मंडळे  – १०३५
पोलीस कर्मचारी  – ६०००
पोलीस अधिकारी – १७०
सीसीटीव्ही कॅमेरे – ७५
टेहळणी मनोरे – ०८