लुटीने माला‘मॉल’

शहरातील मॉलमध्ये झगमगाटी वलयाचा फुगवलेला फुगा आत प्रवेश केल्यानंतर मात्र क्षणार्धात फुटतो.  विश्वास आणि सुरक्षेची हमी घेऊन आत प्रवेश करणाऱ्या ग्राहकाला आत गेल्यानंतर फसवणूक आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. मॉलमधील दिव्यांचा झगमगाट आणि ग्राहकाला आकर्षित करणाऱ्या वस्तू, विशेषत: कपडे पाहिल्यानंतर ते घ्यायचे नसले तरीही घालून पाहण्याचा मोह आवरत नाही. नेमके येथेच पहिला असुरक्षिततेचा फटका ग्राहकांना बसतो.

मॉल म्हटल्यानंतर पहिल्याच माळ्याावर तो संपत नाही, तर किमान तीन ते चार मजले, अशी शहरातील प्रत्येक मॉलची रचना आहे. या प्रत्येक माळ्यावर सर्वाधिक दुकाने कपडय़ांची आणि या दुकानांमधील ‘चेंजिंग रूम’ हा सध्या संशोधनाचा विषय ठरला आहे. जवळपास सर्वच दुकानांमध्ये ‘चेंजिंग रूम’ आहेत, पण त्याच्या सुरक्षिततेची हमी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या दुकानांमध्ये आहे. पुरुष ग्राहकांपेक्षाही विशेषत: महिला ग्राहक कपडे नीट होतात की नाही, यासाठी ते घालून पाहण्यात आघाडीवर असतात. एकाच वेळी बास्केटमध्ये पाच-सहा कपडे घेऊन जायचे. त्यातही तीन कपडे आत नेण्याची परवानगी असते. त्यातील प्रत्येक कपडा घालायचा आणि बाहेर उभ्या असणाऱ्या सहकाऱ्याला दाखवायचा. तो बदलल्यानंतर दुसरा, मग तिसरा, असे करत पाच-सहा कपडय़ांचे जोड घेऊन जायचे. म्हणजे, एकाच व्यक्तीला तब्बल अर्धा ते पाऊण तास लागतो. अशावेळी वादावादीही होते आणि त्याठिकाणी असलेली महिला रक्षकसुद्धा यात आपोआप ओढली जाते. वास्तविक, कपडे घेताना ते घालून पाहण्यामध्ये महिलांची संख्या अधिक असल्यामुळे चेंजिंग रूमची संख्याही अधिक असायला हवी. मात्र, अत्यल्प अशा ‘चेंजिंग रूम’मुळे गोंधळ उडतो. तो सुटण्यापेक्षाही या ‘चेंजिंग रूम’मधील सुरक्षितता सध्या वादातीत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना काही महिन्यांपूर्वी हा फटका बसल्यानंतर ‘चेंजिंग रूम’मधील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. ग्राहक विश्वासाने या ठिकाणी जात असताना छुप्या कॅमेऱ्याची कामगिरी समोर आली होती. हे छुपे कॅमेरे कसे ओळखायचे, याच्या वेगवेगळ्या पद्धती समाजमाध्यमांवरून समोर आल्या. मात्र, अशा सूचनाच कोणत्याही मॉलमधील कोणत्याही ‘चेंजिंग रूम’च्या बाहेर लावण्यात आलेल्या नाहीत. काही मॉल्समधील ‘चेंजिंग रूम’ची अवस्था पाहिल्यानंतर आत जावे की नाही, असा विचार आधी करावा लागतो. अनेक ठिकाणी दरवाजाला कडय़ा नाहीत, तर जेथे त्या कधी आणि कशा निघतील, अशी अवस्था आहे. टोंगळ्याखालील अध्रे पाय दिसतील, अशी काही दरवाजांची अवस्था आहे, तर काही ठिकाणी दरवाजाला वरसुद्धा भल्यामोठय़ा फटी आहेत. काही ठिकाणी चार प्लायवूडच्या पाटय़ा उभारून त्याला ‘चेंजिंग रूम’ असे नाव देण्यात आले आहे. अशा वेळी विश्वासाने मॉलमध्ये शिरणाऱ्या ग्राहकांचा मॉलमधील त्या दुकानदाराकडून विश्वासघाताचाच प्रकार आहे. काही नामांकित ‘ब्रँड’ची दुकाने वगळता इतरत्र हीच स्थिती आहे.

चेजिंग रुमसाठी एकच मार्ग

‘नागपुरातील काही मॉल्समध्ये पुरुष आणि महिलांच्या ‘चेंजिंग रूम’ जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यात प्रवेश करण्याचा मार्ग एकच आहे. ‘चेंजिंग रूम’ची अवस्था पाहिल्यानंतर पुरुष त्यांच्या ‘चेंजिंग रूम’ मधून बाहेर पडल्याशिवाय महिला त्या ठिकाणी जाण्यास धजावत नाहीत.

खिसाकापू युक्ती

कपडे अल्टर करायचे झाल्यास टेलरची व्यवस्था दुसऱ्याच कोणत्या तरी माळ्यावर कानाकोपऱ्यात केलेली असते. त्याला शोधण्याच्या नादात कधी दोन मजले वर चढावे लागते, तर कधी दोन मजले खाली उतरावे लागते. एवढय़ा पराक्रमानंतर तो सापडला तर त्याच्यासमोरसुद्धा कपडे अल्टर करून घेणाऱ्या ग्राहकांची रांग असते. त्याच्याच बाजूला कॉफी आणि स्नॅक्स शॉप असते. त्यामुळे रांगेत कंटाळालेले ग्राहक कॉफी व शॉपमध्ये येऊन बसतो.म्हणजे, येथेही खिसा कापण्याचाच प्रयत्न होताना दिसून येतो.