शहरातील सिमेंट रस्ते हा सत्तापक्षाचा  महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गेल्या दीड दोन वर्षांत कधी निधी नाही तर कधी आचारसंहितेचे विघ्न आल्यामुळे सिमेंट रस्त्यांची कामे लांबणीवर पडली होती. राज्यात भाजपचे सरकार आल्यावर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी शहरात सिमेंट रस्त्यांची घोषणा केली. गेल्या दोन तीन वर्षांत शहरातील रस्त्यावरून खराब झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी महापालिका निवडणुकीपूर्वीच सर्व रस्त्यांची कामे मार्गी लावून श्रेय घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस आहे.

शहरात ३२४ कोटींचे सिमेंट रस्ते तयार करण्यात येत असून यातील १०० कोटी रुपये राज्य शासन तर १०० कोटी नागपूर सुधार प्रन्यास देणार आहे. तर उर्वरित १२४ कोटी महापालिका देणार आहे. तब्बल ७०.८८ किमी लांबीचे एकूण ५५ रस्त्यांचा यात समावेश आहे. ३२४ कोटी रुपयांच्या या कामाला महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली. राज्य शासनाकडून शंभर कोटी रुपये प्राप्त झाले. नागपूर सुधार प्रन्यास टप्या टप्यात शंभर कोटी रुपये सिमेंट रस्त्यासाठी देणार आहे. हिवाळी अधिवेशन काळातच सिमेंट रस्त्याचे भूमीपूजन करण्याचा व २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी कामे पूर्ण करण्याचा मानस होता, मात्र प्रारंभी शासनाकडून निधी मिळण्यास विलंब झाला. याच दरम्यान महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली असून यातून कसेबसे सावरत नाही तोच विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागली होती त्यामुळे काम लांबले होते. विरोधी पक्षाने महापालिकेतील भ्रष्टाचारासोबत शहरातील रस्त्यांच्या मुद्दय़ावर आंदोलने सुरू केली. त्यामुळे सत्तापक्षाने तातडीने रस्त्याची कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

शहरातील सिमेंट रस्ते

  • टप्पा क्रमांक ४ अंतर्गत (पश्चिम नागपूर) वेस्ट हायकोट रोड, सेमिनरी हिल्स, जपानी गार्डन ते एमएल होस्टेल ते विधि महाविद्यालय, लक्ष्मीभवन चौक ते शंकरनगर.
  • टप्पा क्रमांक ११ अंतर्गत (दक्षिण नागपूर) गुरुदेव नगर चौक ते ईश्वरनगर चौक, गुरुदेवनगर चौक, भांडे प्लॉट चौक ते छोटा ताजबाग टी पॉईंट.
  • टप्पा क्रमांक २० (उत्तर नागपूर) सीएमपीडीआय ते भीम चौक ते पाटणकर चौक, पाचपावली पोलीस ठाणे ते नागपूर सुधार प्रन्यास विभागीय कार्यालय, ऑरेंज सिटी मार्केट रोड ते महात्मा फुले शाळा कामठी रोड व अशोक चौक.

भूमिपूजन उद्या

टप्पा दोन प्रकल्पातंर्गत समाविष्ट रस्त्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम १३ मार्च करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. जीएस कॉलेज-लॉ कॉलेज चौक या ठिकाणी सकाळी १० वाजता,  सिंधी हिंदी शाळेचे पटांगण पाचपावली या ठिकाणी सकाळी ११ वाजता आणि लक्ष्मीनारायण मंदिर परिसर सक्करदरा दुपारी १२ वाजता अशा तीन ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.