काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी कस्तुरचंद पार्कवर पहिल्यांदाच एकत्रितपणे जाहीर सभेला संबोधित करणार असल्याने पार्कवर जनसागर निर्माण करण्याचे आव्हान प्रदेश काँग्रेससमोर आहे.
काँग्रेसने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षांचा समारोप नागपुरात करण्याचे ठरवले आहे. अखिल भारतीय काँग्रेसचा या कार्यक्रमाला दोन्ही प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यामुळे प्रदेश आणि स्थानिक काँग्रेसजनांना कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात विदर्भातील उन्हाळ्यास प्रारंभ झाला असून शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा देखील सुरू असतात. काही भागात लग्न समारंभांचा धडाका असतो. डॉ. आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जयंतीदिन आहे. आंबेडकरवादी आठ दिवसांपासून जयंतीच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागलेले असतात. अशा परिस्थितीत विदर्भातील ११ जिल्ह्य़ातील अधिकाधिक लोकांना कस्तुरचंद पार्कवर येण्याची कसोटी वैदर्भीय काँग्रेसवासीयांची आहे.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कस्तुरचंद पार्कवरील जाहीर सभेच्या पूर्वतयारीची आढावा बैठक रविवारी घेतली. विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना नेत्यांनी संबोधित केले. त्यातूनही काँग्रेससमोर आव्हानांची कल्पना येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक भूमिकेच्या विरोधात सातत्याने काम करणारा भाजप आणि केंद्र सरकार विविध कार्यक्रम घेऊन आंबेडकरवाद्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहे, असे काँग्रेस नेते मुकुल वासनिक म्हणाले. काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय असलेल्या शहरात येऊन आव्हान देत आहे, असे सांगून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी गावखेडय़ातून कार्यकर्ते जाहीर सभेला आणताना दलित आणि अल्पसंख्याक बांधवांना वाहनात आपल्या शेजारी बसवून आणण्याचे आवाहन राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केले. काँग्रेसने वर्षभर डॉ. आंबेडकर यांची शतकोत्तर जयंती देशभर साजरी केली. या कार्यक्रमाच्या आयोजन समितीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आहेत, तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी या समितीचे सहअध्यक्ष आहेत.

त्यात उन्हाळ्याचा मोसम..
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर हा दुसरा मोठा इन्व्हेट नागपुरात होत आहे. यापूर्वी हिवाळी अधिवेशनात शेतकरी मोर्चा यशस्वी करण्यात आला. त्यासाठी विदर्भातील पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले होते. केंद्रात आणि राज्यात सत्ता नसताना कार्यकर्त्यांना एकत्रित करणे कठीण जात आहे. आता उन्हाळ्याचा मोसम आहे. त्यामुळे ही परिस्थिती आणखी बिकट आहे, असे एक नगरसेवक म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी तर स्पष्ट बजावले. सर्व स्थानिक नेत्यांनी स्वबळावर कार्यकर्ते जाहीर सभेला आणायचे आहेत. त्यात प्रदेश काँग्रेस मदत करणार नाही. मोर्चाला वाहनांची व्यवस्था केल्यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा वाहने आणि कार्यकर्ते यांची व्यवस्था करण्याची अडचण जाणार असल्याचे काँग्रेस पदाधिकारी खासगीत बोलू लागले आहेत.