उपराजधानीत करोना मृत्यूचा विळखा हळूहळू घट्ट होत आहे. गेल्या ४१ दिवसांत शहरातील करोना मृत्यूचे प्रमाण १८ ऑगस्टला साडेतीन पटीने वाढून ३.४० टक्क्यांवर पोहचले आहे. हे प्रमाण १० जुलैला केवळ ०.९५ टक्के होते. त्यातुलनेत ग्रामीण भागात मृत्यूदर २.१८ टक्के आहे.

१० जुलैला (२३ दिवसांपूर्वी) नागपूर जिल्ह्य़ातील शहर व ग्रामीण भागात करोनाचा मृत्यूदर केवळ ०.९५ टक्के होता. २४ जुलैला हा मृत्यूदर १.५९ टक्क्यांवर तर १८ ऑगस्टला थेट ३.४० टक्क्यांवर पोहचला. यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. शहरात १० जुलैला करोनाचे १७ रुग्ण दगावले होते. हे प्रमाण केवळ ०.९५ टक्के होते. १८ ऑगस्टला हा मृत्यूदर ३.४० टक्क्यांवर (३९५ रुग्ण) पोहचला. १० जुलैला शहरातील १,७८९ बाधितांपैकी ६८.६४ टक्के व्यक्ती (१,२२८ व्यक्ती) करोनामुक्त होऊन घरी परतले होते. आता अचानक रुग्ण वाढल्याने एकूण बाधितांची संख्या थेट ११,६१३ रुग्णांवर पोहचली आहे. यापैकी (४० टक्के) व्यक्तीकरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीणची स्थिती चांगली आहे. ग्रामीण भागात १८ ऑगस्टपर्यंत आढळलेल्या ४,०२४ करोनाबाधितांपैकी २,६१९ व्यक्ती (६५ टक्के) करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. एकूण बाधितांच्या तुलनेत ग्रामीणच्या ८८ रुग्णांचा (२.१८ टक्के) मृत्यू झाला. पूर्वी ग्रामीणमध्येही मृत्यूचे प्रमाण १ टक्क्याच्या खाली होते. परंतु कामठीसह इतर काही भागात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळणाऱ्या दैनंदिन अहवालातून ही बाब समोर आली आहे.

जिल्ह्य़ाबाहेरील मृत्यूचे प्रमाण २६.७२ टक्के

मेडिकल, मेयोसह काही खासगी रुग्णालयांत नागपूर जिल्ह्य़ाबाहेरील २४७ रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत आले. चाचणीत त्यांना करोना असल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान ते दगावले. त्यात मध्यप्रदेश व छत्तीसगडच्याही अनेक रुग्णांचा समावेश आहे. हे प्रमाण तब्बल २६.७२ टक्के असले तरी बहुतांश रुग्ण फारच खालवलेल्या अवस्थेत आल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.