२४ तासांत ५७ मृत्यू; नवीन ३,५१९ रुग्ण

नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत ५७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर ३ हजार ५१९ नवीन रुग्णांची भर पडली. दरम्यान, फेब्रुवारीनंतर प्रथमच सोमवारी जिल्ह्यात दैनिक करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांची संख्या अधिक राहिली.

जिल्ह्यात ७ फेब्रुवारी रोजी ३६० नवीन रुग्ण आढळले होते. त्याहून अधिक ४१६ व्यक्ती करोनामुक्त झाले होते. त्यानंतरच्या दुसऱ्या लाटेत सातत्याने  करोनामुक्तांच्या तुलनेत नवीन बाधित वाढले. त्यामुळे सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या ४१ हजारांवर गेली आहे.  सोमवारी दिवसभरात शहरात २,४०५, ग्रामीण १,१०९, जिल्ह्याबाहेर ५ असे एकूण ३,५१९ करोनाग्रस्त आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख ९० हजार ७९८, ग्रामीण ५३,२७०, जिल्ह्याबाहेरील १,०५७ अशी एकूण २ लाख ४५ हजार १२५ रुग्णांवर पोहोचली. दिवसभरात शहरात ३३, ग्रामीण १९, जिल्ह्याबाहेरील ५ असे एकूण ५७ रुग्ण दगावले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ३,३९७, ग्रामीण १,११२, जिल्ह्याबाहेरील ८७५ अशी एकूण ५,३८४ रुग्णांवर पोहोचली.  दिवसभरात शहरात २,८९४, ग्रामीणला ८०९ असे एकूण ३,७०३ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ५९ हजार ५५०, ग्रामीण ३९,०६१ अशी एकूण १ लाख ९८ हजार ६११ व्यक्तींवर पोहोचली.

शहरात ५१ नवीन लसीकरण केंद्र सुरू होणार

महापालिकेतर्फे नागरिकांच्या लसीकरणासाठी ५१ नवीन लसीकरण केंद्र प्रस्तावित आहेत. यापैकी १० लसीकरण केंद्र सोमवारपासून सुरू करण्यात आले. लक्ष्मीनगर झोनमध्ये ७, धरमपेठ झोन ७, हनुमाननगर झोन ५, धंतोली झोन ५, नेहरूनगर झोन ४, गांधीबाग झोन ५, सतरंजीपुरा झोन ३, लकडगंज झोन ५, आशीनगर झोन ४, आणि मंगळवारी झोनमधील ६ केंद्रांचा समावेश आहे. पुढच्या काही  दिवसात हे सर्व केंद्र सुरु करण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले.

विदर्भात करोनाचे ९९ बळी

विदर्भातील करोनाचे कमी रुग्ण आढळणाऱ्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत रुग्णांचे मृत्यू वाढल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे विदर्भात २४ तासांत करोनाचे तब्बल ९९ मृत्यू नोंदवण्यात आले असून ६ हजार ४४३ नवीन रुग्णांची भर पडली.सर्वाधिक ५७ मृत्यू नागपूर जिल्ह्यात नोंदवले गेले. त्यात शहरातील ३३, ग्रामीण १९, जिल्ह्याबाहेरील ५ रुग्णांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात दिवसभरात ३,५१९ रुग्णांची भर पडली. भंडारा जिल्ह्यात करोनामुळे प्रथमच ९ मृत्यू झाले असून ६५६ नवीन रुग्ण आढळले. गोंदियात करोनाचे २ मृत्यू तर २५५ नवीन रुग्ण आढळले. चंद्रपूर जिल्ह्यात करोनाचे ५ मृत्यू तर २६५ नवीन रुग्ण आढळले. गडचिरोली जिल्ह्यात करोनाचे ३ मृत्यू तर ७३ नवीन रुग्ण आढळले. यवतमाळ जिल्ह्यात १० मृत्यू तर ३०१ रुग्ण आढळले. बुलढाण्यात ५ मृत्यू तर ६३४ नवीन रुग्ण आढळले. अकोल्यात ४ मृत्यू तर २०३ रुग्ण आढळले. वाशीमला २ मृत्यू तर १६० नवीन रुग्ण आढळले. वर्धा जिल्ह्यात २ मृत्यू तर १३६ नवीन रुग्ण आढळले. अमरावती जिल्ह्यात अनेक दिवसानंतर एकही मृत्यू झाला नसून २४१ नवीन रुग्ण आढळले.

चाचण्यांची संख्या घटली

शहरात दिवसभरात ९,६१९, ग्रामीण २,२३९ अशा एकूण ११,८५८ चाचण्या झाल्या. ही संख्या कमी असून त्यांचे अहवाल मंगळवारी अपेक्षित आहेत. रविवारी तपासण्यात आलेल्या १८,१३५ नमुन्यांमध्ये ३,५१९ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. सकारात्मक अहवालाचे हे प्रमाण १९.४० टक्के आहे.

३५,५३८ रुग्ण गृहविलगीकरणात

शहरात २८,५९३, ग्रामीण १२,५३७ असे एकूण ४१,१३० सक्रिय  रुग्ण आहेत. त्यातील ५,५९२ गंभीर संवर्गातील रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये  तर ३५ हजार ५३८ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.