राऊत म्हणतात, तीन दिवसांत निर्बंध; वडेट्टीवार म्हणतात, तूर्तास विचार नाही

नागपूर : करोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी सध्या आहेत ते निर्बंध अधिक कठोर करण्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील  दोन मंत्र्यांमध्ये  दुमत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. सोमवारी  नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पुढील दोन-तीन दिवसात नागपुरात निर्बंध अधिक कठोर केले जातील, असे जाहीर के ले होते. आज मंगळवारी  राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मात्र इतक्यात कडक निर्बंधांची शक्यताच फेटाळून लावली.

राऊत यांच्या वक्तव्यावर व्यापारी वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सरकारच्यावतीने भूमिका मांडली. ते म्हणाले, तिसऱ्या लाटेची शक्यता असली तरी सध्यातरी राज्यात निर्बंध कठोर करण्याची राज्य सरकारची भूमिका नाही. मी संबंधित खात्याचा मंत्री  असलो तरी निर्बंध लावणे किंवा ते अधिक कठोर करण्याचे  अंतिम अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. राऊत यांनी यासंदर्भात विधान करताना त्यांनी  मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली की नाही याची कल्पना नाही, याकडेही वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले. निर्बंध लावण्यासाठी आधीच चार स्तर  निश्चित  करण्यात आले आहेत. पण, सध्या ती स्थिती नाही. जेव्हा रुग्णांची संख्या वाढेल, तेव्हा त्याचा विचार होईल. कोकणात रुग्ण वाढू नये म्हणून मुंबईहून तिकडे जाणाऱ्यांना आरटीपीसीआर बंधनकारक करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

परिस्थितीवर लक्ष 

आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. मुंबई, पुण्यात आणि इतर शहरात रुग्णसंख्येत थोडी वाढ होताना दिसत आहे. नागपुरातील वाढही किं चित स्वरूपाची आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्याने बाजारात गर्दी होत आहे. टास्क फोर्स आणि तज्ज्ञांसोबत  मुख्यमंत्री आणि आम्ही चर्चा करीत आहोत. लोकांनाही  गर्दी करू नये म्हणून आवाहन के ले जात आहे. नियम न  पाळल्यास तिसरी लाट येणे अटळ आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.  ती उंबरठय़ावर आली आहे. घरात कधीही प्रवेश करू शकते. अशावेळी सावधगिरी बाळगणे हे आपले कर्तव्य आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.