चार महिन्यानंतर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाले

नागपूर : शतकोत्तर वर्षांच्या उंबरठय़ावर असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुभाष चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल कार्यालयाकडून त्यांच्या नावाची शनिवारी घोषणा करण्यात आली. पुढील पाच वर्षांसाठी ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूपद सांभाळतील.

डॉ. चौधरी यांच्याकडे नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाचा भार होता. शुक्रवारी कुलगुरूपदासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यात विद्यापीठाचे विद्यमान प्र-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, माजी प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठातील माजी प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, नॉर्वे येथील अगडर विद्यापीठातील डॉ. मोहन कोल्हे, मुंबईतील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथील आयक्यूएसी अधिष्ठाता प्रा. सुनिल भागवत यांचा समावेश होता. प्रत्येक उमेदवारांकडून राज्यपालांनी विद्यापीठ प्रगतीसंदर्भातील त्यांचा दृष्टिकोन तसेच नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भातील योजना जाणून घेतल्या. शुक्रवारी सायंकाळी अंतिम नावाची घोषणा न झाल्याने सर्वाचे लक्ष राजभवनाकडेच लागले होते. अखेर शनिवारी दुपारी राज्यपालांकडून डॉ. चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. डॉ. चौधरी यांची दृष्टी, तंत्रज्ञानातील कुशलता तसेच त्यांचा शैक्षणिक अनुभव इतर उमेदवारांपेक्षा सरस ठरला. याशिवाय त्यांच्या निवडीसाठी विद्यापीठ शिक्षण मंचानेही जोर लावल्याची चर्चा आहे.

डॉ. चौधरी यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रवास

नागपूर विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू असलेले डॉ. सुभाष चौधरी यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्राचा व्यापक अनुभव आहे. मागील ३२ वर्षांपासून ते अध्यापन क्षेत्रात आहेत. जे.डी.अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. याशिवाय विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंगचेदेखील ते प्राचार्य होते. याशिवाय नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण व समित्यांवरदेखील काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे ते सचिवदेखील होते.

रोजगारक्षम विद्यार्थी तयार करणार – डॉ. चौधरी

विद्यापीठाचे मानांकन वाढवण्यावर भर राहील. सध्या नवीन शैक्षणिक धोरण आले असून त्यानुसार बदल करण्याचा प्रयत्न राहील.  बेरोजगारी ही आजची मोठी समस्या असून रोजगारक्षम विद्यार्थी तयार करण्याला प्राधान्य देणार आहे, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त कुलगुरू डॉ.  सुभाष चौधरी यांनी दिली. परीक्षा आणि मूल्यांकन पद्धतीत आवश्यक बदल करण्यावर भर असेल असेही चौधरी म्हणाले. मूळचे नागपूरकरच असलेल्या डॉ. चौधरी यांनी वर्धा येथून पदवीचे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले असून अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.