भगवान महावीरांचे विचार आचरणात आणा – मुख्यमंत्री

भगवान महावीर यांनी अंहिसा आणि पर्यावरणपूरक असा मूलमंत्र समाजाला दिला असताना गेल्या काही वर्षांत मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे राज्यातील अनेक भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. महावीर जयंतीच्या निमित्ताने त्यांनी पर्यावरणासंदर्भात दिलेली शिकवण आणि विचार प्रत्येकाने आचरणात आणून तो जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याची आज गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

जैन सेवा मंडळाच्यावतीने आयोजित महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, आमदार गिरीश व्यास, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, संस्थेचे अध्यक्ष मनीष मेहता, सतीश पेंढारी आदी मान्यवर उपस्थित होते.

भगवान महावीर जगातील मोठे पर्यावरणवादी होते. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी ४२ वर्षे भारतभ्रमण करून खऱ्या अर्थाने बीजारोपण केले. मानव व सृष्टीवर प्रेम करण्याची शिकवण देत समाजात चेतना जागवली. मात्र, पर्यावरणाचे संरक्षण करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आज राज्यातील विविध भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य आणि केंद्र सरकार या दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहे मात्र समाजाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी भगवान महावीरांनी दिलेल्या विचारावर समाजात काम करण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.

राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करून भूतदयेचा विचार समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून गोधन व पशुधन कमी झाल्यास त्याचा परिणाम कृषी व्यवस्थेवर होतो आणि त्याचे वाईट परिणाम आता राज्यात भोगत आहोत. नाशिक जिल्ह्य़ात मांगीतुंगी महोत्सव सरकारने पुढाकार घेऊन साजरा केला. या परिसराचा तीर्थस्थळाचा म्हणून विकास करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला आहे. त्यापैकी ४० कोटी खर्च झाले आहेत. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे हा महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला. जैन समाजाचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. व्यापार वाढविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे राज्य शासन समाजाच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण करून दीपप्रज्वलन केले. जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष मनीष मेहता यांनी प्रास्ताविकात संस्थेचे उद्दिष्ट सांगून समाजातील गोरगरीबांसाठी एखाद्या रुग्णालयाची जबाबदारी शासनाने द्यावी, अशी विनंती केली. यावेळी मुनीराज प्रश्मरती विजय, सुपाश्र्वसागर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सतीश पेंढारी यांनी केले.