स्वामी विवेकानंद त्यांच्या ३९ वर्षांच्या आयुष्यात जगाला प्रेरणा देऊन गेले. कुठल्याही पक्षाची, विचारधारेची व्यक्ती, एवढेच नव्हे तर डाव्या विचारसरणीचे लोकही स्वामी विवेकानंदांना मार्गदर्शक म्हणून नाकारू शकत नाहीत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. स्वामी विवेकानंद, डॉ. आंबेडकर, डॉ. हेडगेवार, दीनदयाला उपाध्याय हे सारे महानुभाव कमी वयातच देशहिताचे कार्य करून गेले. डॉ. श्रीकांत जिचकारांनाही कमी आयुष्य लाभले तरी ते ईश्वरीय कार्य करून गेल्याचे कोश्यारी म्हणाले.

रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयामध्ये ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ज्ञानस्त्रोत केंद्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या  सोहळ्याला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, राजश्री जिचकार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.राज्यपाल पुढे म्हणाले, संस्कृत भाषा ही देववाणी आहे. ती कानावर पडली ही प्रत्येकजण मंत्रमुग्ध होतो. आजही शुब्बालक्ष्मी यांच्या भजनांसमोर लता मंगेशकर यांचे गाणे फिके पडते. संस्कृत भाषेचा हा गोडवा, महात्म्य सर्वानी जाणून ती अवगत करावी. संस्कृत बोलता येत नसली तरी तिचे शिक्षण घ्यावे, त्यात असणाऱ्या ग्रंथांचे अनुवाद  करून त्यांचा अभ्यास करावा, असे आवाहनही कोश्यारी यांनी केले.डॉ. श्रीकांत जिचकारांसारख्या तेजस्वी सूर्याचे फार कमी वयात जाणे ही दु:खद घटना असल्याचे राज्यपाल म्हणाले. शंकराचार्यानी ३२ वर्षांच्या आयुष्यात संपूर्ण देश फिरून सनातन धर्माला पुनर्जीवित केले. स्वामी विवेकानंद ३९ वर्षांत साऱ्या जगाला प्रेरणा देऊन गेले. डॉ. जिचकार हे सुद्धा  एक ईश्वरी देण होते.  जिचकारांनी  समाजसेवेसाठी त्यांच्या ज्ञानाचा वापर केला. यापासून प्रेरणा घेत त्यांना अपेक्षित असणाऱ्या संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य विद्यापीठातून घडावे असे, आवाहनही राज्यपालांनी केले. महाराष्ट्रात आल्यापासून आपल्याला खोकल्याच्या साथीने पकडले आहे. त्यामुळे येथे आल्यावर मराठी भाषेत बाकी काही नाही मात्र, ‘खोकला बरा होत नाही’ हे वाक्य मुखोद्गत झाले, असा किस्सा सांगताच कार्यक्रमात एकच हसा पिकला. डॉ. वरखेडी यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या विकास कामांची माहिती दिली. कुलसचिव डॉ. विजयकुमार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध विद्यापीठांचे कुलगुरू व मान्यवर उपस्थित होते.

संस्कृत आमचा आत्मा

नवीन शिक्षण धोरणात मातृभाषेला महत्त्व दिले आहे. संस्कृत भाषा आमची आत्मा आहे. भारतात बोलल्या जाणाऱ्या असंख्या भाषा  जर देह असतील तर त्यांचा आत्मा संस्कृत आहे. देशाच्या कुठल्याही भागात गेलात तरी प्रत्येक पूजा, लग्न समारंभ व शुभकार्यात आपल्याला संस्कृत श्लोकच कानावर पडतात, असेही राज्यपाल म्हणाले.