24 September 2020

News Flash

सारसांच्या प्रदेशात पहिल्यांदाच फ्लेमिंगोंचा प्रवेश

विणीच्या काळात स्थलांतरण झाल्याने अभ्यासकही संभ्रमात

संग्रहित छायाचित्र

राज्यातील सारस पक्ष्यांचा अधिवास टिकवून ठेवण्याची धुरा एकमेव गोंदिया जिल्ह्य़ाने सांभाळली असताना, आता याच सारसांच्या प्रदेशात पहिल्यांदाच फ्लेमिंगो(रोहित) पक्ष्यांचे आगमन झाले आहे. विशेष म्हणजे, हा स्थलांतरणाचा नाही तर विणीचा काळ आहे. त्यामुळे पक्षी अभ्यासकांनाही अशा अवेळी  आणि नवख्या ठिकाणी येणाऱ्या फ्लेमिंगोंचे कोडे पडले आहे.

भंडारा व गोंदिया हे दोन्ही जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. हिवाळ्यात मोठय़ा संख्येने देशीविदेशी स्थलांतरित पक्षी याठिकाणी येतात. राज्यातून सारस पक्ष्यांचे अस्तित्व संपले असताना के वळ या जिल्ह्य़ाने सारसांचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अशावेळी पहिल्यांदाच भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ाच्या सीमेवर साकोलीपासून नऊ किलोमीटर अंतरावरील सौंदड तलावावर सुमारे ३२ ते ३४च्या संख्येत फ्लेमिंगोचा थवा मुक्कामी आला. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पूनम पाटे यांनी त्याची नोंद घेतली.  विभागीय वनाधिकारी उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक रूपाली सावंत, वनपरिक्षेत्र अधिकारी सदाशिव अवगान त्याठिकाणी पोहोचले. पांढरकवडा, जाम या परिसरात फ्लेमिंगोंची नोंद असून गोंदियातील नोंदीबाबत अनिश्चितता असल्याचे सेवा या संस्थेचे सावन बाहेकर यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी लोणार सरोवर परिसरातही फ्लेमिंगोंचे आगमन झाले होते. दोन दशकांपूर्वी हा पक्षी पाहिल्याची, पण त्याची निश्चित नोंद नसल्याचे लाखणी येथील अशोक गायधने यांनी सांगितले. पक्ष्यांच्या स्थलांतरणाचा (आगमनाचा आणि परतीचा) हा काळ नाही तर सर्वसाधारणपणे हा विणीचा हंगाम समजला जातो. त्यामुळे सारसांच्या प्रदेशात फ्लेमिंगोंचा या ऋतूतील प्रवेश पक्षी अभ्यासकांसाठीही एक कोडे ठरले आहे.

नागपुरातील अंबाझरी तलावावर एप्रिल २०१७ मध्ये हे पक्षी आढळून आले होते. स्थानिक स्थलांतर करणारा हा पक्षी आहे. ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगो प्रजननासाठी गुजरातमध्येच जातात. त्याबाहेर त्यांच्या प्रजननाची नोंद नाही. गोंदिया जिल्ह्य़ात आढळून आलेले फ्लेमिंगो गुजरातमधील असण्याची दाट शक्यता आहे. यात अल्पवयीन एकही नसून वयस्क आणि उपवयस्क पक्षी आहेत. फे ब्रुवारी ते एप्रिल हा त्यांचा विणीचा काळ आहे. मुंबईत अजूनही काही फ्लेमिंगो आहेत. प्रजनन ठिकाणी न जाता योग्य अधिवासाच्या शोधात ते फिरतात. त्यातीलच काही इकडे आले असावेत. तसेही हे भटक्या वर्तणुकीचे पक्षी आहेत.

– गिरीश जठार, वैज्ञानिक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 12:14 am

Web Title: flamingos enter the territory of storks for the first time abn 97
Next Stories
1 स्मार्ट सिटीच्या आरोपांवर आयुक्त तुकाराम मुंढेंनी सोडलं मौन; म्हणाले…
2 Coronavirus Outbreak : मध्यवर्ती कारागृहातही करोना!
3 रुग्णाच्या नकारामुळे पहिल्या रक्तद्रव्य उपचाराचा मुहूर्त टळला
Just Now!
X