सिंचनाचे ‘गढुळ’ पाणी भाग २

मंगेश राऊत

नेर धामना प्रकल्पातील कंत्राटदार कंपनी माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्या कुटुंबातील आहे. त्यामुळे राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या कुटुंबामुळे की काय, या प्रकरणात माजी राज्यपालांच्या मुलानेही रस घेतला होता आणि या प्रकल्पातील अधिकाऱ्यांची बदली रद्द करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवले होते.

नेर धामना प्रकल्पात केंद्रीय जल आयोगाच्या आराखडय़ाची (डिझाइन) प्रतीक्षा न करताच जलसंपदा विभागाने ‘एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि मेसर्स डी. ठक्कर कंपनीला कंत्राट दिले. पण या कारभारावर राज्यभरातून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अकोला येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयातील अधीक्षक अभियंता एस. डी. कुळकर्णी यांची बदली अन्यत्र करण्यात आली होती. पण ते नेर धामना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्यांची बदली दुसरीकडे झाल्यास प्रकल्पावर कसा परिणाम होऊ शकतो, असे सांगणारे पत्र तत्कालीन राज्यपाल एस. सी. जमीर यांचे पुत्र आणि तेव्हाचे नागालँडचे आमदार आपोक जमीर यांनी २४ जून २००९ रोजी त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. माजी राज्यपालांच्या पुत्राचा राज्यातील सिंचन प्रकल्पाशी काहीही संबंध नसताना, त्यांनी नेर धामना प्रकल्पात रस दाखवल्यामुळे आश्चर्य व्यक्त होणे स्वाभाविक आहे.

दरम्यान, या संदर्भात अजय संचेती यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

तीन दिवसांत २८ कोटी आगाऊ

या प्रकल्पाचे कंत्राट २ मार्च २००९ रोजी देण्यात आले. त्यानंतर प्रकल्पाच्या किमतीच्या एकूण २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचा प्रस्ताव २४ मार्च २००९ रोजी सादर करण्यात आला. त्याच दिवशी अकोला विभागीय अभियंत्यांनी तो प्रस्ताव मंजूर केला. २६ मार्चपर्यंत विदर्भ सिंचन विकास महामंडळाने (व्हीआयडीसी) त्यावर निर्णय घेतला. प्रस्ताव सादर झाल्यानंतर अकोल्याचे प्रादेशिक अधिकारी, अमरावतीचे विभागीय अधिकारी आणि ‘व्हीआयडीसी’ने तीन दिवसांत प्रक्रिया गतिमान केली. तीन दिवसांत २८ कोटी रुपये आगाऊ देण्यात आले. या कंत्राटासाठी इतकी घाई का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.