आजपासून बारावीची परीक्षा; विभागातून १ लाख ६८ हजार विद्यार्थी परीक्षा देणार

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उद्या १८ फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी नागपूर विभागीय मंडळाने अतिसंवेदनशील केंद्रांची निवड केली आहे. या केंद्रांवर कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून विभागीय शिक्षण मंडळाकडून बैठे पथक तैनात करण्यात आले आहेत.

यंदा नागपूर विभागातून १ लाख ६८ हजार ५०८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये शहरातील ६५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षेसाठी संपूर्ण तयारी झाली असून बुधवारी सकाळी ११ ते २ दरम्यान इंग्रजीचा पेपर ४७५ केंद्रांवर घेण्यात येईल. परीक्षेदरम्यान कुठल्याच प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी जिल्हानिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी ४४ भरारी पथकेही स्थापन केली आहेत. मुख्य प्रवेशद्वार आणि परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी  विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेन, पॅड व परीक्षा ओळखपत्राशिवाय इतर कोणतीही वस्तू सोबत ठेवू नये, असे आवाहन मंडळाचे विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी केले आहे. बारावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा निश्चित होत असते. मात्र, परीक्षेच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर बराच ताण निर्माण होतो. विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांचीही परीक्षा असते. त्यामुळे यादरम्यान भीती, पाल्याचा अभ्यास आणि आरोग्याची चिंता हे प्रमुख कारण ठरत असते. असे विद्यार्थी आणि पालकांचे वेळीच समुपदेशन होणे आवश्यक असते. त्यासाठीच शिक्षण मंडळाने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून टेलिफोनिक समुपदेशन आणि ऑनलाईन समुपदेशनाचा लाभही उचलता येणार आहे.

धैर्याने परीक्षेला सामोरे जा – देशपांडे

शहरात काही मार्गावर विकास कामे सुरू असल्याने परीक्षेसाठी जाताना विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावर मदत करावी, असे आवाहन करीत विद्यार्थ्यांनी धैर्याने परीक्षेला सामोरे जावे अशा शुभेच्छा विभागीय मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी दिल्या.

अशी राहतील भरारी पथके

४४     भरारी पथके

०७     जिल्हानिहाय भरारी पथके 

०६     विशेष पथक

०१     स्पेशल पथक